अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मनसे उडी घेतली असून महायुतीच्या पाठींब्या बाबत वरीष्ठ निर्णय घेतील असे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र असे असतांना मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आणखी एक मोठा ट्विस्ट निर्माण केला आहे. पानसे आणि शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे निश्चित नसले तरी देखील शिंदे यांनी पानसे यांना शुभेच्छा दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने महायुती जो उमेदवार देईल त्याला पाठींबा देऊ अशी भुमिका घेतल्याने या निवडणुकीत इच्छुक असलेल्या नजीब मुल्ला यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. तिकडे शिंदे सेनेकडून देखील संजय मोरे यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवारांचा कस लागणार असल्याचे चित्र तुर्तास दिसत आहे.
लोकसभे नंतर लागलीच आता कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणुक लागली आहे. या निवडणुकीत भाजपकडून निरंजन डावखरे यांनी कोकणातून दौरा करीत मोर्चे बांधणी करण्यास सुरवात केली आहे. मात्र राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेने देखील या निवडणुकीत आपला उमेदवार उभा केला आहे. अभिजीत पानसे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तर ही निवडणुक मनसे स्वतंत्रपणे लढणार असल्याचे वक्तव्य पानसे यांनी केले आहे. मात्र एका दिवसातच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ही सदीच्छा भेट असल्याचे पानसे यांनी सांगितले आहे. मात्र त्यांच्यात काय चर्चा झाली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. असे असले तरी शिंदे यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्याचे पानसे यांनी स्पष्ट केले आहे. शुभेच्छा याचा अर्थ काय समजायचा हे आता येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. परंतु येत्या २६ जून रोजी या निवडणुकीसाठी जे मतदार आहेत, त्यांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केल्याचे पानसे यांनी सांगितले.
दुसरीकडे अजित पवार गट देखील या निवडणुकीत रंगत आणणार असल्याचे चित्र दिसत असतांनाच त्यांनी मात्र आपली तलवार म्यान केल्याचे दिसून आले आहे. मागील निवडणुकीत या मतदार संघातून नजीब मुल्ला यांनी निवडणुक लढविली होती. त्यामुळे आता देखील ते पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता होती. मात्र ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी आम्ही महायुतीचा धर्म पाळू असे सांगत, महायुतीचा जो उमेदवार असेल त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु आता महायुतीत असलेल्या शिंदे सेनेकडून संजय मोरे यांचेही नाव आता आघाडीवर आले आहे. मागील निवडणुकीत त्यांना दुसºया क्रमांकाची पसंतीची मते मिळाली होती. त्यात आता पुन्हा ते इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता शिंदे सेना महायुतीचा धर्म पाळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.