ठाणे: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मात्र राज्यातील कोरोनाची आणि पुराची परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील अनेक नेते मंडळींनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील उद्धव ठाकरे यांना फोनद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंची ठाण्यात पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक होत आहे. याचदरम्यान एका पत्रकाराने उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाबाबत आठवण करुन दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत, तुम्ही काळजी करू नका, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
राज्यातील पूरपरिस्थिवरही भाष्य केलं. प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने पूरग्रस्तांना मदत करत आहे. मीही आवाहन केलं होतं. त्यानुसार मनसे सैनिकांनी प्रत्येक गावात जाऊन मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. इतरही पक्षाचे लोक मदत करत आहेत. अशावेळी मदत करणं महत्त्वाचं आहे. नुसता पाहणी दौरा करण्यात काही अर्थ नाही. जेवढी मदत पूरग्रस्तांना मिळेल तेवढं चांगलं आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना सल्ले-
- सोशल मीडियाचा वापर कमी करा.
- स्थानिक पत्रकारांना धरून राहा. तुमच्या कार्यक्रमाची माहिती त्यांना द्या. असे कार्यक्रम करा की स्थानिक पत्रकार देखील तुमच्यावर खुश असतील.
- प्रभाग अध्यक्षपद रद्द करण्यात येणार आहे. प्रभाग अध्यक्षपदी दुसरा पर्याय देण्यात येणार. पुण्यात जसा पर्याय निवडला तसाच ठाण्यात निवडणार.
- 25 दिवसांनंतर ठाण्यात देखील प्रभाग अध्यक्षपदाला पर्याय देणार.
- निवडणुकीच्या तयारीला लागा.
- जे नवीन येतील, जे तिकिटासाठी येत असतील त्यांनी तिकीटासाठी येऊ नका.
- ठाणे महानगरपालिकेत 130 नगरसेवक आहेत. तेवढेच वार्ड, शाखाध्यक्ष मला पाहिजेत. शाखाध्यक्षांची संख्या जास्त वाढवत बसू नका. शाखा अध्यक्ष हाच पक्षाचा कणा आहे.
- अजून एकमेकांशी हेवेदावे करू नका. एकमेकांशी जोडून राहा. पक्षबांधणी करा. नव्यांनी आणि जुन्यांनी एकमेकांशी वाद करू नका. मनसे पक्ष कसा बळकट होईल यासाठी विचार करा. त्याच्यासाठी मेहनत करा.