संदीप प्रधानठाणे : मशिदीवरील भोंगे उतरवण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतल्यापासून भाजपचे नेते त्या भूमिकेला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पाठिंबा देत असून, यामुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चेला वेग आला आहे. भाजपमधील उत्तर भारतीय नेते व या पक्षासोबत असलेला उत्तर भारतीय मतदार यामुळे अस्वस्थ झालेला आहे. राज यांनी हिंदुत्ववादाची भूमिका घेतली असली तरी यापूर्वी उत्तर भारतीयांवर त्यांनी केलेले हल्ले विस्मरणात गेलेले नाहीत. साहजिकच यामुळे उत्तर भारतीय मतदार भाजपपासून दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपचा देशभर वाजणारा भोंगा उतरवण्याकरिता उद्धव व राज या ठाकरेबंधूंनी परस्परांना दिलेली ही अदृश्य टाळी तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.भाजपसोबत सध्या गुजराती व उत्तर भारतीय मतदार मोठ्या संख्येने आहे. उत्तर प्रदेशात गेले काही दिवस केवळ दोन-तीन तास वीजपुरवठा होतो. मात्र तरीही योगी आदित्यनाथ यांना राजकीय यश लाभले. गुजरातमध्येही तीव्र पाणीटंचाई आहे. मात्र गुजराती मतदार मोदींसोबत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या पालिका निवडणुकीत भाजपला रोखायचे तर एका समूहात संभ्रम निर्माण करणे ही महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांची गरज आहे. त्यातूनच मनसेने भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला व हिंदुत्वाची गर्जना केली. या भूमिकेला भाजप विरोध करू शकत नाही. राज यांनी आदित्यनाथ यांची दोनवेळा स्तुती केली. सुरुवातीला भाजप-मनसे युतीचे भाजपच्या काही नेत्यांनी जाहीर स्वागत केले. परंतु लागलीच देवेंद्र फडणवीस व अन्य काही नेत्यांनी मनसेसोबत युती अशक्य असल्याचे जाहीर केले. भाजपमधील उत्तर भारतीय नेत्यांनी मनसेला सोबत घेण्याबाबत नाराजी प्रकट केल्याची चर्चा आहे. मुंबई महानगर क्षेत्रातच उत्तर भारतीय मतदारांची संख्या एक कोटींपेक्षा जास्त आहे. बुधवारी औरंगाबादमध्ये मनसैनिक व विहिंपचे कार्यकर्ते महाआरती करणार होते. या कार्यक्रमात सहभागी न होण्याचे आदेश विहिंपच्या नेत्यांनी दिले, हे बोलके आहे.
शिवसेनेच्या गडात टीका टाळलीऔरंगाबाद व ठाणे हे शिवसेनेचे मोठे गड आहेत. तेथील जाहीर सभेत राज यांनी शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली नाही. त्यांच्या टीकेचा रोख केवळ शरद पवार यांच्यावर राहिला, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज यांनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे भाजपकडे जाणारी हिंदुत्ववादी मते रोखण्यात त्यांना यश आले तर त्याचा फटका भाजपलाच बसणार आहे. मुंबईतून शिवसेना व ठाकरे ब्रँड संपवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांमुळे कदाचित हे दोन भाऊ राजकीय अस्तित्वाच्या गरजेपोटी एकत्र आले असतील, अशी चर्चा आहे.
पुरंदरेंचा मुद्दाही डोकेदुखीशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे ब्राह्मण असल्याने त्यांना लक्ष्य केले गेले, असे राज सातत्याने बोलत आहेत. भाजपसोबत ब्राह्मण मतदार सुरुवातीपासून आहे. राज हे या मुद्द्यावरून पवार यांना लक्ष्य करीत असल्याने ब्राह्मण समाज राज यांच्यावर खुष आहे. भाजप या मुद्द्याचे जाहीर समर्थन करू शकत नाही कारण त्यामुळे मराठा समाज दुरावण्याची भीती भाजपला वाटते. राज जेवढी स्पष्ट भूमिका घेतात तेवढी भाजप घेत नाही, असे वाटल्याने काही ब्राह्मण मते भाजपपासून दुरावून राज यांच्या पारड्यात पडली तर त्याचाही फटका भाजपला बसेल, अशी चर्चा आहे.
महाराष्ट्रातील येत्या महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती होणार नाही हे भाजप नेत्यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे युतीची चर्चा चुकीची आहे.राजहंस सिंह, आमदार, भाजप