ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे उतरविण्याच्या केलेल्या आवाहनाच्या तसेच त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनीही मनसैनिकांसह एक हजार ४०० समाजकंटकांविरुद्ध मंगळवारी कलम १४९ नुसार नोटिसा बजावल्या. कलम १४४ लागू केले असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा ठाणे शहर पोलिसांनी दिला आहे.
ठाण्याचे सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, सध्याच्या राजकीय आणि धार्मिक हालचालींच्या पार्श्वभूमीवर कोणीही कायदा हातात घेऊ नये. तसेच जातीय तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य अथवा सामाजिक माध्यमांवर संदेश, फोटो किंवा व्हिडिओ पाठवू नये. कोणी कायद्याचे उल्लंघन केल्याचे किंवा शांततेचा भंग करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
पोलिसांच्या रजाही रद्दसध्याच्या राजकीय आणि धार्मिक हालचालींच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात शांतता राखण्याच्या दृष्टीने आयुक्तालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा रद्द केल्या आहेत. तसेच आदेश सर्व पोलीस उपायुक्तांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
असा राहणार बंदोबस्तठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांमध्ये कायदा - सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने ३५० अधिकारी, सात हजार ५०० कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या नऊ प्लाटून, ३०० गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत.
कठोर कारवाई करण्याचा इशारामनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, आमदार राजू पाटील यांच्यासह पक्ष नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर संभावित संशयितांवर १४९ नुसार नोटीस बजावली आहे. तिचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत उतरविले गेले नाही, तर प्रत्येक मशिदीसमोर हनुमान चालीसा मोठ्या आवाजात लावण्याचा इशारा मनसेने दिला आहे. असे कोणतेही कृत्य करून तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा या नोटिसीद्वारे मनसेला पोलिसांनी दिला आहे.