येत्या ९ एप्रिल रोजी ठाण्यात मनसेच्या माध्यमातून राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला मूस रोड, त्यानंतर पोलिसांनी परवानगी नाकारल्याने गजानन महाराज चौक हा रस्ता अंतिम करण्यात आला होता. मात्र आता या सभेचे ठिकाण आणि तारीखही बदलण्यात आली आहे. आता गडकरी गडकरी रंगायतन येथील दुसरा रस्त्यावर अर्थात चिंतामणी चौक ते दगडी शाळा या परिसरात ही सभा होणार असल्याची माहिती मनसेचे नेते अभिजीत पानसे, समीर देशपांडे, आमदार राजू पाटील आणि अविनाश जाधव यांनी दिली असून सभेची तारीख मात्र बदलण्यात आले आहे. आता ही सभा नव्या तारखेप्रमाणे १२ एप्रिल रोजी होणार आहे.
गडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळील मुस चौकात महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा जाहीर घेण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना अर्ज दिला होता. दरम्यान याच दिवशी हिंदीभाषा एकता परिषद आणि राजस्थानी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी ७.३० वाजता गडकरी रंगायतनमध्ये २८ व्या राष्ट्रीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्नी एकनाथ शिंदे, गृह निर्माण विभागाचे पोलिस महासंचालक विवेक फणसाळकर यांच्यासह आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत.
शिवाय शहरात सध्या सर्वत्र चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे. ९ एप्रिल ला अष्टमी असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते हे लक्षात घेऊन आम्ही पोलिसांनी केलेल्या विनंतीला मान देत ही सभा ९ एप्रिल ऐवजी १२ एप्रिल रोजी घेण्याचे निश्चित केले असल्याची माहिती अभिजीत पानसे यांनी दिली. तर पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली हे काम केले याची माहिती आम्हाला असल्याचा दावा समीर देशपांडे यांनी केला मात्र आता १२ एप्रिल या सर्वांची उत्तरे दिली जातील असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.नव्या ठिकाणी होणार सभागजानन महाराज चौक रस्ता सभेसाठी गुरुवारी दुपारी अंतिम करण्यात आला. मात्र त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत पोलिसांकडून स्पष्टता झाली नाही. त्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाण्यात धाव घेऊन दोन्ही जागांची चाचपणी केली. अखेर पोलिसांच्या विनंतीला मान देत मनसेने ९ एप्रिलची सभा १२ एप्रिल रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार आता ही सभा गडकरी रंगायतनच्या दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर म्हणजेच चिंतामणी चौक ते दगडी शाळा येथे घेण्याचे निश्चित केले आहे. ही सभा सायंकाळी सहा वाजता सुरू होईल असेही यावेळी अविनाश जाधव यांनी सांगितले.