ठाणे- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच सभा झाली. त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. राज यांना मानणारा आणि त्यांचा विरोधी असे दोन्ही गट त्यांच्या भाषणावरून तुंबळ शब्द युद्ध करत आहेत. शब्दांचे बाण एकमेकावर सोडत आहेत. स्वतःला जन्मतः बंडखोर म्हणवून घेणारे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यात मागे कसे राहतील..? त्यांनी तर राज ठाकरे यांच्या भाषणावर टीका करणारी ट्विटर मालिकाच लावली.
भाषणाच्या शेवटी कधीतरी जय भीम म्हणा... असा सल्ला देत ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर भेट देणाऱ्या बंधू-भगिनींना बद्दल आपण काय बोललात हे कोणी विसरले नाही असेही चिमटे आव्हाडांनी काढले. राज ठाकरे यांचे भाषण पूर्ण न ऐकता त्यावर विपर्यास करणाऱ्या बातम्या दिल्या जात आहेत, असा दावा मनसेच्या गोटातून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या ९ एप्रिल रोजी राज ठाकरे ठाण्यात जाहीर सभा घेणार असल्याची बातमी आली आहे.
आपल्या बातम्यांची केलेली मोडतोड आणि त्यावरील खणखणीत उत्तर राज ठाकरे भाषणातून देतील असे मनसे नेते सांगत आहेत. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेमुळे अस्वस्थ होत राज ठाकरे ठाण्यात जाहीर सभा घेत आहेत. आव्हाडांना राज घाबरले, असा दावा आव्हाड समर्थक करत आहेत. येत्या नऊ तारखेला कोणाचा दावा खरा हे कळेल. तोपर्यंत पतंगबाजीला नक्की संधी आहे.