डोंबिवली - कल्याण-डोंबिवली शहरात अनाधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला असून दिवसेंदिवस हे गंभीर होत चाललं आहे. सोमवारच्या कडोंमपा भाजपा उपमहापौरांनी महासभेत दिलेला राजीनामा नाट्यावरून दिसून येते की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे असा आरोप मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी केला आहे.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात की, काही नगरसेवकांच्या आशिर्वादानेच शहरातील महापालिकेच्या गार्डन,शाळा या सारख्या राखीव भूखंडावर बिनदिक्कत अनधिकृत बांधकामांचे पेव गावगुंडाकरवी सुरू आहे, करोडोंचा शासकीय महसूल बुडवून हे काम सुरू आहे, महापालिकेचे ९० टक्के अधिकारी या भ्रष्टाचारात अखंड बुडाल्याचे दिसून येतं. ह प्रभाग अधिकारी कंखारे यांची उचबांगडी व संजय घरत यांची लाच घेताना लाच लुचपत खात्याकडून झालेली धरपकड ही ताजी उदाहरणं समोर आली आहेत.
त्याचसोबत कहर म्हणजे अनधिकृत बांधकामांची यादी देवून सुध्दा लाख लाख रूपये लाच देऊन बिनदिक्कत अशा बांधकामांची दस्त नोंदणी (रजिस्ट्रेशन) ही सरकारी नोंदणी कार्यालयातून होत आहे, हे म्हणजे भ्रष्टाचाराचा कळसच म्हणावा लागेल.परंतु अशा महत्त्वाच्या विषयावर व महापालिकेचा करोडोंचा महसूल बुडवणाऱ्यांविरोधात जर निवडून दिलेले नगरसेवक व शिवसेनेच्या महापौर दुर्लक्ष करत असतील तर ते अनधिकृत बांधकामांना आणि भ्रष्टाचाराला पाठिंबाच देत आहेत हे स्पष्ट होते असं त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
तसेच जर एखादा नगरसेवक अशा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत असेल तर त्याला एकटे पाडून कोंडीत पकडायचे हे आता नेहमीचेच झाले आहे, पण ह्या सर्व घडामोंडींमुळे एक मात्र नक्की की शहराचे मात्र वाट्टोळे लागत आहे, नागरी सोयी-सुविधांचाही बट्टयाबोळ लागत आहे, विकास कामे करायला महसूल उत्त्पन्नच नाही, शहराच्या मोकळ्या जागा दादागिरीने गिळंकृत होत आहेत. हे सर्व सत्य आहे हे जर बघायचे असेल तर डोंबिवलीच्या गोग्रासवाडी गेटवर तर त्या परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांची नांवासकट यादी असलेले एक भले मोठे होर्डींग गेले अनेक दिवस लागले आहे पण महापालिकेला अशी बांधकामे मात्र दिसत नाहीत हे आश्चर्य नसून भ्रष्टाचार बोकाळल्याचे उत्तम उदाहरण आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याच पक्षाची सत्ता असणाऱ्या महापालिकेच लक्ष घालून अधोगतीकडे चाललेल्या आमच्या शहराला प्रगतीच्या, विकासाच्या दिशेने घेऊन जातील ही अपेक्षा आहे असं राजेश कदम यांनी सांगितले आहे.