लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिका शाळेतील मुलांना ऑनलाइन शिक्षणाची गोडी लागण्यासाठी १२०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मनोज शेलार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. ठाणे महापालिकेने तसा निर्णय घेतल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
उल्हासनगर महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत ऑनलाइन उपस्थित राहावे व त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासाठी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत महापालिका आयुक्त व संबंधित पदाधिकारी यांना तसे पत्र दिले. प्रोत्साहन भत्ता दिल्यास मुलांचे पालक मुलांची १०० टक्के उपस्थिती राहील, याची खबरदारी घेतील, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. कोरोनामुळे गेले वर्षभर शाळा बंद असून महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिक्षणात रस घ्यावा, याकरिता ठाण्यात भत्ता दिला जात आहे.
महापालिका प्रशासन व सत्ताधारी-विरोधी पक्षांनी विद्यार्थ्यांना भत्ता सुरू करतानाच शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा लिखाण सराव व्हावा, याकरिता गृहपाठ वह्या, चित्रकला वही तसेच इतर शैक्षणिक साहित्य मिळवून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी शेलार यांच्यासह सचिन चौधरी, विजय पवार, रवी आहिरे आदी उपस्थित होते.
........
वाचली