ठाणे : कोरोना आपत्तीच्या काळात ठाणेकरांना मालमत्ताकरमाफी देण्यास चालढकल करणाऱ्या ठाणे पालिका प्रशासनाने शहरातील मोक्याची अशी तब्बल ७५ हजार ३९० चौ.मी. जागा मेट्रो ठेकेदाराच्या घशात फुकट घातली आहे. या जागेचे एक दमडीही भाडे त्याने महापालिकेला तीन वर्षांपासून दिलेले नाही. यामुळे त्याच्याकडून संबंधित जागेचे रेडीरेकनरप्रमाणे भाडे वसूल करण्याची मागणी मनसेने गुरुवारी केली.वडाळा-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-४ च्या प्रकल्पासाठी ठाण्याचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ही जागा लेबर कॅम्प, आरएमसी प्लान्ट, कास्टिंग यार्डसाठी जागा कोणतेही शुल्क न आकारता दिली आहे.तिच्या वापराबद्दल पालिका प्रशासनाला चांगले उत्पन्न मिळू शकले असते. परंतु, जयस्वाल यांनी कोणत्या हेतूने मोफत जागा वापरण्यास दिली, याबाबत संशयाचे ढग निर्माण होतात, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला. शासकीय नियमानुसार अशी कोणतीही जागा खाजगी ठेकेदार, संस्था आदी कोणाला देताना निविदा प्रक्रिया राबविली जाते.मात्र, स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करून ठेकेदारास हा भूखंड विनामूल्य दिला आहे.ठेकेदाराने निविदा भरताना या जागेसाठी लागणारे शुल्क देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण संबंधित ठेकेदाराला महानगरपालिकेच्या मदतीने पाठीशी का घालत आहे.तसेच ठाणे पालिका प्रशासनाने जागा मोफत दिली, म्हणून ठाणेकरांना मेट्रो तिकिटात सवलत थोडीच मिळणार आहे. याउलट, खासगी ठेकेदाराच्याच कंपनीकडून ही मेट्रो चालवली जाणार आहे, असे स्पष्ट करतानाच याप्रकरणी ठोस कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.
ठामपाने मेट्रोच्या जागेचे भाडे रेडीरेकनरप्रमाणे वसूल करावे, मनसेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 1:50 AM