सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरात सिंधू भवना पाठोपाठ उत्तर भवनासाठी आमदार कुमार आयलानी यांनी २५ लाखाच्या निधीची घोषणा केली. मात्र क्रमांक दोनची लोकसंख्या मराठी भाषिकांची असतांना मराठी भवन कधी? असा प्रश्न मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला.
उल्हासनगर सिंधी समाज बहुल शहर असून समाजाची सांस्कृतिक वारसा राखण्यासाठी सपना गार्डन येथे गेल्या पाच वर्षा पासून सिंधू भवनाचे काम सुरू आहे. दरम्यान उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी उत्तर भवन बांधण्यासाठी २५ लाख निधीची घोषणा केली. तसेच भवनाचे भूमिपूजन नवरात्री दरम्यान करण्यात येणार असल्याचे आयलानी यांनी सांगितले. उत्तर भारतीय भवनाची चर्चा सुरू होताच मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी मराठी भवन कधी? असा प्रश्न उपस्थित केला. सन २०१९ मध्ये सिंधू भवन पाठोपाठ मराठी भवन उभे राहण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करून अंदाजपत्रकात ५ कोटीच्या तरतुदींची मागणी केली होती. मात्र महापालिकेने यावर कोणताही निर्णय घेतला नसल्याचे देशमुख म्हणाले.
ऐन महापालिका सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी शहराच्या विकासा ऐवजी सिंधू भवन, उत्तर भारतीय भवन, मराठी भवन आदींची चर्चा रंगली आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मधील उत्तर भारतीय भवनला स्थानिक विरोध करीत असून अंटेलिया येथील महापालिका भूखंडावर उत्तर भारतीय भवन उभारण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या शहर दौऱ्या पूर्वी शहर विकास कामा ऐवजी उत्तर भारतीय भवनाची चर्चा सुरू असून आता मनसेने मराठी भवनाचा प्रश्न उपस्थित केला आहे.