ठाणे - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. विशेष म्हणजे राज यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. त्यातच, मुब्र्यातील मदरशांमध्ये ईडीने धाडी टाकाव्यात, असेही ते म्हणाले होते. राज यांच्या भाषणानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आता, मुंब्र्यात मनसे विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पेटल्याचे दिसून येते. मनसेच्या कार्यालयावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी यात राष्ट्रवादीचा हात नसल्याचे म्हटले आहे.
मुंब्र्यातील तन्नवर नगर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी मनसेच्या वाहतूक सेना 'राजगड' या कार्यालयाचा पक्षाचा लावलेला फलक उतरवण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत कालावधी दिला होता. मात्र, तो बोर्ड न उरवल्याने आज मनसेच्या राजगड कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी ही दगडफेक राष्ट्रवादीने केली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
राजगड नावाचा फलक न काढल्यास आम्ही आमच्या पद्धतीने फलक काढू मग कोणतीही कारवाई झाली तरी चालेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अय्याज बबलू यांनी मनसेला दिला होता. या प्रकरणी मुंब्राचे मनसे वाहतूक शाखा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी मनसे वरिष्ठ पदाधिकारी आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. पोलिसांनीही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सतर्कता दाखवत मनसे वाहतूक शाखा या कार्यालयाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त लावला होता. तसेच राष्ट्रवादीच्या संबंधीत कार्यकर्त्यांना १४९ अंतर्गत नोटीस देखील बजावल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मनसेचा हा फलक उतरवता आला नव्हता. मात्र, वातावरण शांत झाल्यानंतर पोलिसांची पाठ फिरताच काही अज्ञात इसमांनी दगड मारून हा मनसे पक्षाचा फलक फोडला आहे.
मनसेच्या फलकावर दगड मारून फडतानाचे दृश्य सीसीटिव्हीमध्ये कैद झाल आहे. हा फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांनी म्हणजेच अयाज बबलू यांनी फाडला असल्याचा आरोप यावेळी मनसे वाहतूक शाखेचे मुंब्रा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी अय्याज बबलू यांनी मनसेचा हा फलक उतरवण्यासाठी धमकी देत फलक न उतरल्यास आम्ही आमच्या स्टाईल ने फलक उतरवू असा इशारा दिला होता. या प्रकरणी प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास असून मनसे ही गुंडागर्दी खपून घेणार नाही, असे मनसे वाहतूक शाखेचे मुंब्रा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी म्हटले आहे.