अंबरनाथ : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अंबरनाथ शहराध्यक्षपदी कुणाल भोईर यांची निवड केली आहे. तर याच पदासाठी शर्यतीत असलेले माजी नगरसेवक स्वप्नील बागूल यांना शहर संघटकपद देण्यात आले आहे. तीन वर्षानंतर मनसेला शहराध्यक्षपद मिळाले आहे.अंबरनाथमध्ये मनसेला नेतृत्वच नसल्याने पक्ष आणि त्यातील कार्यकर्ते भरकटलेले होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात अंबरनाथ शहरात प्रभावी नेतृत्व नसल्याने हे पद रिक्त ठेवले होते. निवडणुकीत मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याने पक्ष संघटनेचे शहर कार्यकारिणीवर लक्षच नव्हते. त्यातही मनसेचे दोन गट एकमेकांना शह देण्यासाठी प्रयत्न करत होते. दोन्ही गटांकडून शहराध्यक्षपदासाठी उमेदवार पुढे केले जात होते. एका गटाकडून बागूल तर दुसऱ्या गटातून भोईर यांचे नाव पुढे करण्यात आले होते. शहरात पक्ष संघटना समतोल रहावी यासाठी दोन्ही गटांचे समाधान होईल असा निर्णय घेण्यात आला. शहराध्यक्षपदी भोईर यांची तर शहर संघटक पदावर बागूल यांची निवड करण्यात आली. या दोघांचे नियुक्तीपत्र ठाकरे यांनी दिले.तावडे यांच्याकडे सूत्रेदरम्यान, बदलापूरमध्येही मनसेने शहराध्यक्षपदाची जबाबदारी उमेश तावडे यांच्यावर सोपवली आहे. तर शहर संघटकपदी राजेश शेटे यांची व शहर सचिव पदावर योगेश जाधव यांची निवड जाहीर केली आहे. पक्षात उभारी येणार का याकडे लक्ष आहे.
मनसेला तीन वर्षानंतर मिळाला शहराध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 5:09 AM