भिवंडी : २७- १६ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या भिवंडी तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिरोळे ग्रामपंचायतीवर मनसेने एकहाती सत्ता प्रस्थापित केली. थेट सरपंच निवडीत विजय मिळवल्यानंतर गुरुवारी उपसरपंच निवडणुकीत मनसेच्या रविना मानकर यांनी शिवसेना उमेदवाराचा ६ विरुद्ध ३ मताने पराभव करीत सत्ता प्रस्थापित केली आहे. तालुक्यात दोन ग्रामपंचायतींवर मनसेने विजय संपादन केला होता. त्यामध्ये तालुक्यातील शिरोळे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी लक्ष्मी लाथड या थेट निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी पार पडलेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत मनसेतर्फे रविना मानकर तर शिवसेनेकडून जयदास मते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक घेण्यात आली. ज्यामध्ये रविना मानकर या विजयी झाल्या. या घोषणेनंतर मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष साजरा केला.
मनसेने ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन केल्याने या गावाचा विकास इतर ग्रामपंचायतीपेक्षा अधिक होईल व नागरिकांच्या विश्वासास सरपंच उपसरपंच यांसह ग्रामपंचायतीचे सदस्य पात्र ठरतील असा विश्वास मनसे विद्यार्थी ठाणे जिल्हा अध्यक्ष परेश चौधरी यांनी व्यक्त केला. तर सरपंच व उपसरपंच यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डी के मात्रे, भिवंडी लोकसभा अध्यक्ष शैलेश बिडवी, विद्यार्थी सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संतोष साळवी, मदन पाटील, संजय पाटील यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्ते पदाधिकारी व शिरोळे ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"