सुरेश लोखंडे/ठाणे
ठाणे : अनधिकृत बांधकामांकडे राज्य शासनासह महापालिकांचे लक्ष मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेधले असता त्यांची आठवण करून देण्यासाठी मनसे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने येथील उप वनसंरक्षक संतोष सस्ते यांची भेट साेमवारी घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी मुंब्रा डोंगरावरील उभारलेल्या अनधिकृत दर्ग्यांचा पर्दाफाश केला. या डोंगरावरील अनधिकृत बांधकामांची पाहणीसह मशीद व दर्ग्याचे सर्वेक्षण करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
शिवाजी पार्क येथील मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाची दखल घेऊन दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने सांगली आणि मुंबई या दाेन्ही ठिकाणी कारवाईचा बडगा उगारत मजार जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर राज्यभर मनसैनिकांनी आपापल्या विभागातील अनधिकृत दर्गे, मशिदीविरोधात आवाज उठवला. त्यानुसार ठाणे शहर मनसेनेही मुंब्रा डोंगरावरील अनेक बेकायदा दर्ग्याचा पर्दाफाश करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. जागा वनविभागाची असल्याने मनसेच्या तक्रारीची दखल घेत वनविभागाने तातडीने मुंब्रा डोंगरावरील बांधकामांची पाहणी केली आहे. मात्र कारवाईचा बडगा न उगारल्याने सोमवारी मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोरे व मनसे सैनिकांच्या शिष्टमंडळाने उपवनसंरक्षकांचे दालन गाठून कारवाईचा बडगा करण्याची मागणी लावून धरली. दरम्यान, मुस्लीम बांधवांचा रमझान महिना सुरू असल्याने आम्हाला कोणतीही शांतताभंग करायची नाही. असे स्पष्ट करून रविंद्र मोरे यांनी, येणाऱ्या धमक्यांना आम्ही भिक घालत नसल्याचेही सांगितले.