ठाणे : ‘जिल्हा रुग्णालयात नवजात बालके जमिनीवर’ या मथळ्याखाली लोकमतने सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूतीगृहाची व्यथा मांडली होती. याची दखल घेऊन मनसे महिला सेनेने मंगळवारी प्रशासनाला ही परिस्थिती तत्काळ न सुधारल्यास आणि गरोदर महिलांना चांगली वागणूक न दिल्यास मनसे स्टाईलने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.रुग्णांची संख्या आणि दुसरीकडे गर्भवतींसाठी असलेल्या अपुऱ्या खाटांच्या समस्येला ‘लोकमत’ने १८ आॅगस्ट रोजी वाचा फोडली होती. शिवाय इतर समस्याही मांडल्या होत्या. लोकमतचा हा मुद्दा उचलून प्रसूतीगृह आणि त्याची क्षमता याचे समीकरण कधी जुळणार आहे की नाही? असा सवाल महिला सेनेने प्रशासनाला केला आहे. नवजात बालकांसाठी आणि बाळंतीणसाठी बाळंतपण ही नाजुक गोष्ट आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रसूतीगृहात क्षमतेपेक्षा जास्त बाळंतीण महिला असून त्यांना दोन बेडच्या मध्ये ठेवले जात आहेत. हा रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा एक प्रकार असून तातडीने याबाबत खुलासा करावा, अशी मागणी महिला सेनेने केली आहे. अन्यथा कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय उग्र आंदोलन छेडण्याचा कडक इशारा त्यांनी दिला.रुग्णालयाच्या प्रसूतीगृहात ४० बेड आणि ९४ महिला रुग्ण आहेत. क्षमता कमी असल्याने या महिलांना अक्षरश: लाद्यांवर झोपविले जाते. प्रसूतीकाळात आॅपरेशन थिएटरमध्ये नर्सकडून महिलांना मारले जाते, शिवीगाळ केली जाते. कोणत्याही रुग्णालयाला अशा प्रकारची वर्तणूक शोभत नाही. या महिलांना चांगली सुविधा द्या, अन्यथा आम्ही आंदोलन छेडणार.- समिक्षा मार्कंडे, ठाणे उपशहर अध्यक्ष
सिव्हिल रुग्णालयातील प्रसूतीगृहाची मनसेकडून दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 12:37 AM