ठाणे : टोलदरवाढी विरोधात मनसेने पुकारलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मनसे आणखी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. सरकारकडून अपेक्षा नव्हती. लोकांच्या मागणी खातर आम्ही गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन करीत होतो. मात्र आता बस झाले, यापुढे आम्ही भगतसिंग होऊन रस्त्यावर उतरु असा इशारा मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली. त्याची सुरवात पुढील आठवड्यापासून हे आंदोलन सुरु केले जाईल. स्वर्गीय आनंद दिघे यांनी याच टोलविरोधात आवाज उठविला होता. दिघे यांच्यासाठी टोल बंद करावा, टोलदरवाढ बंद करावी अशी मागणी देखील त्यांनी केली.
ठाण्यात मनसेच्या वतीने टोलदरवाढी विरोधात मागील महिन्यापासून आंदोलन उभारण्यात आले आहे. तर मागील तीन दिवसापासून टोलदरवाढी विरोधात मनसेने आमरण उपोषण सुरु केले आहे. परंतु या आंदोलनाची दखल अद्यापही प्रशासनाने घेतली नसल्याचेच दिसून आले. त्यामुळे आपली पुढील भमिका स्पष्ट करण्यासाठी शनिवारी याच ठिकाणी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जाधव यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. मनसे नुसते आक्रमकपणे आंदोलन करते अशी जनतेची भावना होती, त्यामुळे त्यांच्यासाठी हा गांधी सप्ताह साजरा केला. मुख्यमंत्र्यांनी विनंती आहे की, त्यांनी २०१६ साली न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी टोलनाक्यावर धाव घेऊन स्वत: ते म्हणाले होते, की हा टोलचा झोल बंद करा. मात्र अद्यापही हा टोल बंद झालेला दिसत नाही. त्यातही शुक्रवारी एमएमआरडीएच्या प्रतिनिधींनी देखील या टोलबाबत मुख्यमंत्री हे स्वत: भुमिका घेतात असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अशी विनंती या माध्यमातून करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्यथा यापूर्वी ज्या पध्दतीने क्लस्टर, धरणाचे, ७५० चौरस फुटांच्या घरांना करमाफी दिली जाणार अशी जी काही आश्वासने दिली होती. ती कोणतीच पूर्ण झालेली नाही. त्यामुळे टोलचे आश्वासन देखील खोटे होते का? असेच आता ठाणेकरांना वाटू लागले आहे. त्यामुळे टोलबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. १९९९ मध्ये धर्मवीर आनंद दिघे यांनी याची सुरवात केली होती. तेव्हा टोल सुरु होण्यापूर्वीच त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा टोल बंद करावा अशी मागणी त्यांनी केली. ठाणेकरांना एकही गोष्ट अद्याप मुख्यमंत्र्यांनी दिलेली नाही. भिंतीचे रंग उडाले, डिस्को लाईट बंद पडल्या आहेत. आम्हाला डिस्को लाईट नको आम्हाला चांगले धोरण द्या, आरोग्य सेवा द्या, शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करुन द्या अशी मागणीही त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून केली. परंतु आता बस झाली गांधीगारी आता भगतसिंग होणार असून त्याची सुरवात पुढील आठवड्यापासून केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे घेणार भेट
मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या या आंदोलनाला रविवारी मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे सकाळी १० वाजता भेट देणार आहेत. त्यावेळी आंदोलनकर्त्यांबरोबरच येथील स्थानिक रहिवासी, गृहसंकुलातील रहिवासी भेट देणार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता राज ठाकरे रविवारी टोल बाबत काय भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.