ठाणे : ठाणे महापालिका आणि मागील कित्येक वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला शिवजयंतीचा विसर पडला असल्याची टीका मनसेचे ठाणे पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे. तसेच निवडणुका आल्यावरच स्वर्गीय आनंद दिघे यांची आठवण शिवसेनेला होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मनसेच्या टीकेला शिवसेनेने जोरदार प्रतिउत्तर देऊन कदाचित मनसेला शिवसेनेकडून सुरू असलेला शिवजयंती उत्सव दिसला नसेल, संपूर्ण ठाणे शहरात शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत शिवजयंती साजरी झाली असून, मिरवणुकादेखील काढल्या असल्याची माहिती माजी महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.
तिथी प्रमाणे सोमवारी महापालिका हद्दीत विविध ठिकाणी शिवजयंती साजरी झाली. सायंकाळी मनसेने मासुंदा तलाव येथे शिवजयंती साजरी केली. परंतु, तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी करावी, असे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीच सांगितले होते. त्यानुसार सध्या महाराष्ट्रात शिवसेनेचेच सरकार आहे. तर आठ दिवसांपूर्वी ठाण्यातही शिवसेनेचीच सत्ता होती. किंबहुना मागील कित्येक वर्षे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. असे असतानाही त्यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ साधी रोषणाईही केली नसल्याची टीका जाधव यांनी केली. कित्येक वर्षे शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण केले आहे. असे असतानाही त्यांना कदाचित शिवजयंतीचा विसर पडला असावा, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली. तसेच स्वर्गीय आनंद दिघे यांची आठवण केवळ निवडणुका आल्यावरच शिवसेनेला होते, अशी टीकाही त्यांनी केली.
मनसेने केलेल्या या टीकेला शिवसेनेनेदेखील प्रतिउत्तर दिले आहे. जाधव यांना कदाचित विसर पडला असेल. परंतु ठाण्यात ९९ टक्के शिवजयंती ही शिवसेनेकडून साजरी झाली आहे. मासुंदा तलाव येथेदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आहे. तसेच शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत ती उत्साहात आणि दणक्यात साजरी झाली असून, मनसेने ते पाहावे, असे म्हस्के यांनी म्हटले आहे.