ठाणे: भारत- चीन सिमेवर वाढलेल्या तणावाचे पडसाद सर्वच स्तरावर उमटायला सुरुवात झाली असून ठाण्यात सुरु असलेल्या चीनच्या प्रकल्पाविरोधात शुक्रवारी मनसेने आंदोलन केले.
या प्रकल्पाच्या बाहेर अक्षरशः चिनी भाषेच पाट्या लिहिल्या असून एका चीनच्या कंपनीचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे या पाट्या त्वरित काढण्यात आल्या नाही तर पुन्हा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. यावेळी 'चीनसे देश बचाव' अशा घोषणा देखील मनसेच्या वतीने यावेळी देण्यात आल्या.
ठाणे शहरातील ढोकाळी परिसरात एका चीनमधील कंपनीचा गृहप्रकल्प सुरु असून यांची साधी माहिती देखील अद्याप कोणाला नाही. जवळपास या प्रकल्पाचे काम पूर्ण होत आले असून शुक्रवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाच्या ठिकाणी आंदोलन केले. यावेळी सुरु असलेले प्रकल्पाचे काम बंद करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी चीनच्या भाषेत बोर्ड लावण्यात आले असून ते बोर्ड हटवण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.
जोपर्यंत भारत चीनसोबत संघर्ष संपत नाही तोपर्यंत या प्रकल्पातील एकही घर विकू देणार नाही असा इशारा देखील जाधव यांनी दिला आहे. केवळ इशारा न देता हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही जाधव यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.