"राम नवमी होती, तेव्हा विभाग अध्यक्षांनी रामरथ तयार करायचा आणि प्रत्येक ठिकाणी फिरवायचा असं ठरवलं होतं. रामनवमीच्या मिरवणुकांच्या इथे तो रथ जाईल. एका चांगल्या भावनेनं तो रथ तयार करण्यात आला. मुंबईमध्ये शिवाजी पार्क येथे गडकरी चौक आहे. गडकरी चौक हा फार पूर्वीपासून आहे आणि शिवसेना भवन हे १९६६ पासून आहे. त्या गडकरी चौकात रामरथाचं पूजन केलं आणि उद्घाटन केलं आणि त्यानंतर तो फिरणार होता. त्यावेळी लगेच पोलीस पाठवले आणि रामरथ जप्त केला. विभाग अध्यक्षांनाही ताब्यात घेतलं," असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले. राज ठाकरे यांच्या उत्तर सभेदरम्यान ते बोलत होते.
"या घटनेनंतर मी त्या ठिकाणी गेलो. त्यांना काय गुन्हा घडला अशी विचारणा केली. त्यावेळी शिवसेनेला डिवचण्यासाठी हनुमान चालीसा लावली असं सांगितलं. शिवसेना हनुमान चालीसा लावल्यावर कधीपासून डिवचायला लागली?," असा सवाल देशपांडे यांनी केला. "मी एखादवेळेस हे समजू शकतो, की कोणत्या अन्य धर्माचं काही केलं म्हणून शिवसेना डिवचली गेली. पण हनुमान चालीसा म्हटलं, मारुती स्त्रोत्रानं शिवसेना डिवचत असेल तर तो भगवा रंग बाजूला ठेवून दुसरा रंग परिधान करावा. त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही," असंही ते म्हणाले.
"शिवसेनाप्रमुखांचे विचार संपवताय""आम्ही संपलेलो नाही. शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही संपवायला निघाला आहात. हिंदुत्व संपवलं आहे. म्हणून तुम्ही डिवचले जात आहात. आमच्या घरासमोर हनुमान चालीसा लावा आम्ही नाही डिवचलं जात. जर तुम्ही डिवचले जात असाल तर शिवसेना प्रमुखांचे विचार हा तुमच्याकडून संपत चाललाय. आम्हाला संपलेला पक्ष म्हणणाऱ्यांचा पक्ष संपतोय हे महापालिकेच्या निवडणुकांदरम्यान दिसेल," असंही त्यांनी नमूद केलं.