लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील मुंब्रा देवी डोंगरावरील अनधिकृत मस्जिद आणि मजारी त्वरित हटवण्यात याव्यात, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन 15 दिवसात कारवाई केली नाही तर याच जागेवर मंदिर बांधू, असा इशारा दिला होता.
जाधव यांच्या इशाऱ्यानंतर त्याचे पडसाद मुंम्बऱ्यात उमटले. याच पार्शवभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे पोलिसांनी जाधव यांना मुंब्रा परिसरात कलम 144 नुसार प्रवेशास मनाई आदेशाची नोटीस बजावली आहे. मुंब्रा परिसरात रमजानच्या महिन्यांमध्ये मनसेच्या या भूमिकेमुळे वातावरण तणावपूर्ण झाले. मागील दोन दिवसांपासून मुंब्रा पोलीस ठाण्याच्या आसपास मोठ्या प्रमाणात जमाव जमत होता. त्यातच सध्या रमजानचा महिना सुरु असल्याने शांतता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी खबरदारी घेत मनसेचे नेते जाधव यांना मुंब्रा भागात प्रवेश बंदीची नोटीस बजावली आहे.