लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील जवळीक गेल्या काही महिन्यांत वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळेच की काय कोपरी-पाचपाखाडी, अंबरनाथ, कल्याण (पूर्व) अशा काही विधानसभा मतदारसंघांत संधी असूनही मनसेने शिंदेसेनेविरुद्ध उमेदवार दिले नसल्याचे मत राजकीय निरीक्षकांमध्ये व्यक्त होत आहे. डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविरोधातही उमेदवार दिलेला नसल्यामुळे महायुतीचे नेते व मनसे यांच्यात छुपी युती झाल्याची चर्चाही येथे सुरू आहे.
कोपरी-पाचपाखाडी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांनी विक्रमी मताधिक्याने निवडून येण्याकरिता मनसेने या ठिकाणी उमेदवार न दिल्याची चर्चा आहे.
ओवळा माजीवडा
ओवळा माजीवडा हा शिंदेसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांचा गड मानला जातो. मागील निवडणुकीत ते जास्त मताधिक्याने निवडून आले होते. येथे यंदा मनसेने दिलेला उमेदवार तुल्यबळ नसल्याचे बोलले जाते आहे. मात्र, हा उमेदवार उद्धवसेनेला मारक असल्याची चर्चा आहे.
अंबरनाथ
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेचे विद्यमान आ. बालाजी किणीकर यांना पक्षांतर्गत विरोधकांनी घेरले आहे. किणीकर यांची डोकेदुखी वाढू नये याकरिता मनसेने येथे उमेदवार दिलेला नाही, असे बोलले जाते. या मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या जास्त आहे. मनसेने इथे उमेदवार दिला तर मराठी मते विभागली जातील व त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
कल्याण
कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे उमेदवार आ. राजू पाटील यांच्या विरोधात शिंदेसेनेने अद्याप उमेदवार दिलेला नाही. लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना या विधानसभा मतदारसंघातून सर्वांत जास्त मते मिळाली होती. त्यामुळे शिंदेसेनेने ही भूमिका घेतल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
डोंबिवली
आ. राजू पाटील आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांची मैत्री असल्याने डोंबिवली मतदारसंघात मनसेने उमेदवार दिलेला नाही. मनसेने इथे उमेदवार दिल्यास त्याचा थेट फायदा उद्धवसेनेला होण्याची शक्यता आहे. कल्याण (पूर्व) विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिंदेसेना हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मंत्री चव्हाण यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला असून त्यांच्या विनंतीवरून मनसेने उमेदवार न दिल्याची जोरदार चर्चा आहे.