लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सोमवारपासून ठाण्यात महिन्यातील एक दिवस महिलांच्या लसीकरणासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. यावरून मनसे पुरस्कृत् महिला सेना महापौर नरेश म्हस्के यांच्यात श्रेयवादाची लढाई जुंपली आहे.
महिलांच्या लसीकरणासाठी एक दिवस राखून ठेवावा, अशी पहिली मागणी मनसे महिला सेनेने केली होती असा दावा करून "म्हणे मी ठाणेकरांचा भाऊ आणि बहिणीचे श्रेय एकटाच खाऊ" अशा शब्दांत महापौर यांच्यावर महिला सेनेने टीका केली आहे, तर याचे श्रेय महिला सेनेले घ्यावे मी ठाणेकरांना सेवा देतोय, अशी प्रतिक्रिया महापौरांनी लोकमतला दिली.
ठाणे शहर महिला सेनेने १८ ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना निवदेन देऊन महिन्यातील एक दिवस हा महिलांच्या लसीकरणासाठी असावा, अशा मागणीचे निवेदन दिले होते. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी ठाणे महापालिकेने प्रसिद्धी पत्राद्वारे महिलांचेही जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या आठवड्यातील एक दिवस पार्किंग प्लाझा येथे महिलांसाठी खास लसीकरण मोहीम ठेवण्यात येणार तिची सुरुवात २३ ऑगस्टपासून करणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. त्यावरून ही घोषणा म्हणजे मनसेच्या महिला सेनेच्या निवेदनाचे श्रेय लाटण्याचा उद्योग महापौरांनी केला आहे. परंतु, या घोषणेचे श्रेय फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेनेचेच आहेत. "श्रेयाचे राजकारण महापौरांना लखलाभ" असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेना अध्यक्ष समीक्षा मार्कंडे यांनी म्हटले आहे.
--------------------------
मनसेच्या महिला सेनेने माझ्याकडे अशी कोणतीही मागणी केलेली नाही. एखादा विचार हा शंभर जणांच्या मनात येऊ शकतो. बऱ्याच दिवसांपासून महिलांसाठी एक दिवस लसीकरणासाठी उपलब्ध करून देण्याचे डोक्यात होते. त्यामुळे इथे श्रेयवादाचा मुद्दा नाही, मनसे महिला सेनेला श्रेय घ्यायचे असेल, तर त्यांनी ते घ्यावे. ठाणेकरांना सेवा देणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.
- नरेश म्हस्के, महापौर