मीरारोड - विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना मीरा-भाईंदरमध्ये मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसलेला आहे.
मीरा-भाईंदर मधील राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून प्रसाद सुर्वे यांची ओळख होती. मनसे स्थापन झाल्यापासून प्रसाद सुर्वे हे मनसेत काम करत होते. त्यांच्या अगोदर मिरा-भाईंदर शहराचे शहराध्यक्ष अरुण कदम होते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रसाद सुर्वे यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. प्रसाद सुर्वे यांनी मीरा भाईंदरमध्ये मनसेत चांगले काम केले. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मनसेत अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला होता. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत मनसेला एकही जागा जिंकता आली नाही म्हणून पक्षात पुन्हा मरगळ आली. तेव्हापासून पक्षात अंतर्गत वाद सुरु झाले. या वादामुळेच प्रसाद सुर्वे यांना पक्षात काम करताना अडथळे निर्माण केले जात होते. त्यामुळे त्यांनी कंटाळून आपल्या समर्थकांसह आ.नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्या सोबत मनसेचे सचिव नरेंद्र पाटोळे, पठाण , रॉबर्ट डिसोजा , सोनिया फर्नांडिस, सुधीर कदम या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ईडी चौकशी झाल्यानंतर मनसे विधानसभा निवडणूक लढणार की नाही या संभ्रमात कार्यकर्ते होते. मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांच्या झालेल्या बैठकीतही राज ठाकरेंनी निर्णय घेतला नव्हता. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर मनसे निवडणुकीत आपले १०० ते १२० उमेदवार उभे करणार असल्याचं निश्चित झालं. सोमवारी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे राज्यभरातील मनसेच्या इच्छुक उमेदवारांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याला राज ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र तत्पूर्वी मीरा-भाईंदर शहरात भाजपाने मनसेला धक्का देत अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश करुन घेतला आहे.