कल्याण: ठाणे वाढत असल्याने त्याठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मग कल्याणडोंबिवलीत रुग्ण वाढून देखील ठाण्याप्रमाणे लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय का घेतला जात नाही असा सवाल कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विट केले आहे.
पालकमंत्री शिंदे यांनी कल्याण अत्रे रंगमंदिरात 20 जून रोजी कोरोनासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत चारही आमदार व प्रशासनाशी चर्चा केली होती. या बैठकीत आमदार पाटील यांनी पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीत 15 दिवसाचा एक कडक लॉकडाऊन घेतला गेला पाहिजे अशी सूचना केली होती. मात्र त्यांच्या मागणीची विचार केला गेलेला नाही. दरम्यान आयुक्तांनी ज्या प्रभगात जास्त रुग्ण वाढत आहे. त्या प्रभागातील क्वारंटाइन झोन सील केले.
आमदार पाटील यांच्या मते क्वारंटाइन सेंटर सील करणो हा रुग्ण संख्या कमी करण्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकत नाही. त्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन घेतला गेला पाहिजे. ठाणे शहरापेक्षा जास्त रुग्ण कल्याण डोंबिवलीत मिळून येत आहे. दररोज 350 ते 400 नवे रुग्ण आढळून येत आहे. ठाण्यापेक्षा जास्त गंभीर स्थिती कल्याण डोंबिवलीची आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत लॉकडाऊची आवश्यकता असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.