लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : मराठी नंबर प्लेटवर होत असलेली कारवाई तातडीने थांबवावी, मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्यास परवानगी नसेल, तर तातडीने तसा कायदा करून ती द्यावी. महाराष्ट्रातच मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी थांबवावी, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी डिसेंबर महिन्यात केली होती. तसे पत्रही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. मात्र, यावर लक्ष न दिल्याने त्यांनी चक्क गुजराती भाषेत ट्विट करून ठाकरे यांना चिमटा काढला आहे.
भाजपची व्होट बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजराती समाजाला साद घालण्यासाठी शिवसेनेने सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेचे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असा नारा शिवसेनेने दिला आहे. यावर भाजपने टीका केली असून, आता मनसेने मुख्यमंत्र्यांना गुजराती भाषेत ट्विट करून टार्गेट केले आहे. महाराष्ट्रात मराठी नंबरप्लेटवर कारवाई केली जात आहे, जरा लक्ष द्या. मराठी माणूस आपल्याकडे आशेने बघत आहे, हेच ट्विट त्यांनी गुजराती भाषेत केले आहे.