महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : ‘ठामपा’साठी मनसे, राकाँ, काँग्रेस आघाडी?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 01:56 AM2019-10-25T01:56:26+5:302019-10-25T06:06:45+5:30
नवे समीकरण; युतीविरोधात फॉर्म्युला
- अजित मांडके
ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात मनसेच्या अविनाश जाधव यांना मिळालेली ७२ हजार मते ही येत्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत युतीकरिता धोक्याची घंटा आहे. ठाणे मतदारसंघ शिवसेनेला स्वत:कडे खेचून घ्यायचा होता. मात्र, भाजपने तो सोडला नाही व भाजपच्या संजय केळकर यांनी राखला. मात्र, मनसेने घेतलेली मते लक्षात घेता महापालिकेत युतीत बेबनाव निर्माण झाल्यास तो मनसेच्या पथ्यावर पडायला वेळ लागणार नाही.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या गडावर कमळ फुलवले. त्यानंतर, आता झालेल्या निवडणुकीत संजय केळकर यांनी हा गड राखला असला, तरी मताधिक्यात घसरण झाली आहे. मतदारसंघावर शिवसेना, भाजपचे वर्चस्व असतानाही घटलेल्या मताधिक्यासाठी जबाबदार कोण, असा प्रश्न आहे. मागील निवडणुकीत मनसेला केवळ आठ हजार मते मिळाली होती. या निवडणुकीत त्यात तब्बल ६४ हजार ८७४ मतांची वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत ठाणे विधानसभेत युतीच्या बालेकिल्ल्याला शह देण्यासाठी मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी अशीच हातमिळवणी केली, तर ते समीकरण युतीला घातक ठरणार आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे यांना ८३ हजारांची निर्णायक आघाडी मिळाली होती. त्यामुळे विधानसभेला येथील गणित सोपे असेल, असे बोलले जात होते. परंतु, ते तितके सोपे नसल्याचे दिसून आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सुमारे ३५ ते ४० हजार मते मनसेला मिळाल्याचे बोलले जाते. जाधव यांना राबोडी, महागिरी यासारख्या भागांतून चांगली मते मिळाल्याचे दिसून आले.शिवसेना आणि भाजपतील सुप्त संघर्षाचा फटका केळकर यांना बसल्याची चर्चा आहे.
घोडबंदरचा काही भाग, कोलशेत, बाळकुम, ढोकाळी, राबोडी, टेकडी बंगला, वृंदावन, श्रीरंग, महागिरी, हिरानंदानी मेडोज या शहरातील काही महत्त्वाच्या भागातूनही मनसेला आघाडी मिळाल्याचे दिसून आले. वास्तविक पाहता, या सर्व भागांमध्ये शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांचे वर्चस्व आहे. असे असतानाही त्या भागातील मतदारांनी विरोधात मतदान केल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे १२ नगरसेवक असून भाजपचे १९ नगरसेवक आहेत. असे असतानाही मताधिक्य घटले, हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेनेच्या ज्या मंडळींचा केळकर यांना विरोध होता, त्यांच्याच क्षेत्रामधील मतांमध्ये दिसून येणारी घट बोलकी आहे.
आघाडीचा मनसेला लाभ
विधानसभेत भाजपला पराभूत करण्याकरिता मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी दिसली. त्याचा फायदा मनसेला झाला. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा हीच आघाडी दिसणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. अर्थात, महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांत इच्छुक जास्त असल्याने अशी तीन पक्षांची आघाडी करण्यात मर्यादा असल्या, तरी युतीवर मात करण्याचा हा मार्ग विरोधकांना दिसला आहे.