लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राबोडीतील मनसेचे प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी राबोडीतील बिस्मील्ला हॉटेलसमोर दिवसाढवळया गोळया झाडून हत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपींच्या शोधासाठी तीन पथकांची नियुक्ती केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. हा हल्ला क्लस्टरच्या वादातून झाल्याचा संशय मनसेचे ठाणे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.राबोडीतील रहिवाशी शेख हे काही कामानिमित्त मोटारसायकलवरुन सोमवारी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास बिस्मील्ला हॉटेलसमोरुन जात होते. त्याचवेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या हल्लेखोराने त्यांच्या दिशेने रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. एक गोळी त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूला लागली. यात ते खाली कोसळून गंभीर जखमी झाले. काही स्थानिक रहिवाशांनी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांचा मृतदेह मुंबईतील जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भरदिवसा झालेल्या या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी मनसेचे पदाधिकारी तसेच ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख अविनाश जाधव, शहरप्रमुख रवींद्र मोरे यांच्यासह ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी आणि राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे आदींनी भेट देऊन पाहणी केली. राबोडीतील क्लस्टरला मनसेने विरोध केला होता. शेख यांनी त्यासाठी आंदोलने केली होती. या विरोधातूनच त्यांची हत्या झाल्याचा संशय मनसेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.
‘‘जमील शेख यांनी गेल्या अनेक दिवसांपासून क्लस्टरला विरोध केला आहे. यातूनच ही हत्या झाल्याची शक्यता आहे. २०१७ मध्येही त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्या हल्ल्याचेही मारेकरी अद्याप पकडले गेले नाहीत. आपल्या जीवाला धोका असल्याचे शेख यांनी यापूर्वीच पोलिसांना अर्ज दिला होता.’’अविनाश जाधव, संपर्क प्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ठाणे- पालघर जिल्हा.