उल्हासनगर : शहरातील ओल्या-सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचऱ्यापासून खत निर्माण करण्यासाठी उद्याने, खुल्या जागेत खत निर्माण करण्याची महापालिकेची योजना आहे. कॅम्प नं-१ येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील ही कचऱ्यापासून खत तयार करणारी योजना उभारली जात आहे. मात्र शिवाजी महाराजांचे नाव असलेल्या मैदानात कचऱ्याचे वर्गीकरण व इतर प्रक्रिया नको, अशी भूमिका घेत मनसेने या उद्यानातील योजनेला विरोध केला आहे. तसेच बंद उद्यानात हे प्रकल्प उभारावे, अशीही मागणी केली आहे.
उल्हासनगरात डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर, महापालिकेने काही ठिकाणी कचऱ्याचे ओला-सुका असे वर्गीकरण सुरू केले. त्यासाठी पालिका उद्याने व खुल्या जागा अशा २० ठिकाणांची निवड करण्यात आली. त्यातील कॅम्प नं-१ धोबीघाट येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी बांधकामे केल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी दिली. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचे उद्यान दिसले काय? असा प्रश्न मनसेचे मैनुद्दीन शेख यांच्यासह शहर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे, तर खत निर्मिती दुसऱ्या उद्यानामध्ये हलविण्याची मागणीही केली आहे.
शहरातील उसाटने गावहद्दीतील डम्पिंगचा प्रश्न लांबणीवर पडला आहे. डम्पिंगवरील कचऱ्यात घट होण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे काम महापालिका आरोग्य विभागाने सुरू केले. मात्र ओल्या कचऱ्याचे खत करण्यासाठी बंद पडलेल्या उद्यानाचा उपयोग महापालिका आरोग्य विभागाने करावा, अशी मागणी मनसेकडून होत आहे. तसेच शिवाजी महाराज उद्यानातील खत योजना दुसरीकडे हलविण्याची मागणी मनसेने महापालिकेकडे केली, अशी माहिती मैनुद्दीन शेख यांनी दिली.