मीरा रोड : नयानगर भागातील बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या जाचामुळे त्रासलेल्या रहिवाशांनी सातत्याने महापालिकेपासून शासनापर्यंत तक्रारी केल्यानंतर महापालिकेने फेरीवाल्यांवर कारवाई केली. पालिकेच्या कारवाईचे रहिवाशांनी स्वागत केले असताना मनसे व काँग्रेसने मात्र राजकारण करीत फेरीवाल्यांचे समर्थन केले.
नयानगरमधील बाणेगर शाळा गल्लीत फेरीवाल्यांना बसवण्यात काही गुंडप्रवृत्तीचा सहभाग आहे. याठिकाणी दोन शाळा असून, फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे या भागातील रहिवाशी त्रासले आहेत. या फेरीवाल्यांना हातगाड्या भाड्याने देणारे आहेत. पालिका व पोलिसांत तक्रार करणाऱ्याचे नाव या फेरीवाल्यांना बसवणाऱ्याकडे पोहचायचे. मग तक्रारदाराच्या घरी जाऊन शिवीगाळ, धमक्या दिल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत, असे एका रहिवाशाने सांगितले.
महापालिकेमार्फत येथील फेरीवाल्यांवर कारवाई करताना एक फेरीवाला हातगाडी सोडत नसल्याने त्याची हातगाडी काढून घेत ती हातोडे घालून तोडण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरून युवक काँग्रेस आणि मनसेने राजकारण सुरू केले. काँग्रेसने पालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले तर मनसेने त्या फेरीवाल्याला नवीन हातगाडी भेट दिली.
गेल्यावर्षी डिसेंबरमध्येदेखील महापालिकेने या भागातील बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या हातगाड्या जेसीबीने तोडून टाकल्या होत्या. परंतु त्यावेळी मनसे व काँग्रेस चिडीचूप होते. त्यामुळे केवळ राजकीय स्टंटबाजीसाठी हा खटाटोप केला जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
...........
वाचली