- मुरलीधर भवार कल्याण : राज्यात मनसेने १०० जागा लढविल्या. मात्र, मनसेच्या इंजीनने कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला धडक दिली आहे. मनसेचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील यांनी सेनेचे रमेश म्हात्रे यांचा पराभव करत राज्यात एकमेव जागा मिळवली आहे. शिवसेनेला अत्यंत थोड्याथोडक्या मतांनी पराभवाची धूळ खावी लागली आहे. दरम्यान, मनसेच्या या विजयामुळे येथील सर्व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
पाटील हे विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. २०१४ मध्ये त्यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र, पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी यंदा विधानसभेसाठी त्यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवावी लागली. अत्यंत कमी दिवसांत त्यांनी हायटेक प्रचार केला. सोशल मीडियावर ते प्रभावी ठरले. बदल हवा आहे, अशी त्यांच्या प्रचाराची टॅगलाइन होती. कल्याण ग्रामीणच्या मतदारांनी त्यांना कौल दिला आहे.
२००९ मध्ये या मतदारसंघातून मनसेतर्फे रमेश पाटील हे निवडून आले होते. रमेश पाटील हे राजू पाटील यांचे मोठे बंधू आहेत. २०१४ मध्ये रमेश पाटील यांचा पराभव झाला होता. त्यामुळे या मतदारसंघात मनसेचा झेंडा पुन्हा रोवायचा, असा चंग कार्यकर्त्यांनी बांधला. पाटील यांच्या प्रचारासाठी ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी कल्याण-शीळ रोडवरील वाहतूककोंडी, खड्डे हे मुद्दे उपस्थित केले होते. तसेच २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी २७ गावे संघर्ष समितीची होती. या मुद्दयावर मनसेचा या समितीला पाठिंबा होता. मनसेने त्यांच्या मागणीला जाहीरनाम्यात स्थान दिले. याशिवाय, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीने मनसेला साथ दिली. याचा मोठा फायदा पाटील यांना मिळाला. त्यामुळे त्यांचा प्रचार व विजय सुकर झाला.
दुसरीकडे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांना पक्षाने एबी फॉर्म देऊन उमेदवारी जाहीर करताच रमेश म्हात्रे यांच्या समर्थकांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला. भोईर यांना उमेदवारी दिल्यास निवडणुकीत त्यांचे काम करणार नाही, असा दबाव पक्षावर टाकला. पक्षाने २०१४ मध्ये म्हात्रे यांना आश्वासन देऊनही त्यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी पक्षाने भोईर यांची उमेदवारी कापली. हा घोळ पक्षात निर्माण झाला. या मुद्यावर कार्यकर्ते विभागले गेले. या कार्यकर्त्यांना एकत्रित आणण्यासाठी भोईर यांना म्हात्रे यांच्या प्रचार मेळाव्यात एकाच व्यासपीठावर आणले गेले. मात्र, त्याचा उपयोग निवडणुकीत झाला नाही. निवडणुकीच्या प्रचारात म्हात्रे यांनी सगळा मतदारसंघ पालथा घातला. मात्र, त्यांच्या प्रचारासाठी पक्षाच्या बड्या नेत्यांनी एकही सभा घेतली नाही.
म्हात्रे यांच्या वचननाम्यात भोईर यांनी केलेल्या विकासकामांचा उल्लेख होता. मात्र, त्याचा काहीच उपयोग म्हात्रे यांना झाला नाही. म्हात्रे यांना निवडून आणण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मेहनत केली. मात्र, ही मेहनत वाया गेल्याने शिंदे यांच्या नेतृत्वाला एक धक्का आहे. परंतु, शिवसेनेचा हा दारुण पराभव नसून म्हात्रे यांनी पाटील यांना चांगली लढत दिली. मात्र, त्यांचा पराभव अवघ्या सहा हजार ७०० मतांच्या फरकांनी झाला आहे. २७ गावांतील नागरी समस्या, खराब रस्ते, पाणीसमस्या आणि कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडी या समस्यादेखील शिवसेनेला नडल्या आहेत. या समस्यांवर मनसेने प्रचारात रान उठविले होते.
दिव्यातील मतदारांनी दिली साथ
राजू पाटील यांना दिवा, दातिवली परिसरातील मतदारांनी चांगली साथ दिली आहे. दिव्यात शिवसेनेचे आठ व राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक आहेत. शिवसेनेची मदार दिव्यातील जवळपास ६० हजार मतांवर होती. मनसेचे पक्षप्रमुख यांनी या निवडणुकीत दिव्यात जाहीर सभा घेतली नाही. मात्र, यापूर्वी घेतलेल्या सभेत त्यांनी ‘दिव्याखाली अंधार’असे वक्तव्य केले होते. तोच इम्पॅक्ट मनसेला तारणारा ठरला आहे. म्हात्रे यांना डोंबिवलीतील सागाव, सागर्ली या परिसरात चांगले मतदान मिळाले आहे.
राजू पाटील यांना दिवा, दातिवली परिसरातील मतदारांनी चांगली साथ दिली आहे. दिव्यात शिवसेनेचे आठ व राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक आहेत. शिवसेनेची मदार दिव्यातील जवळपास ६० हजार मतांवर होती. मनसेचे पक्षप्रमुख यांनी या निवडणुकीत दिव्यात जाहीर सभा घेतली नाही. मात्र, यापूर्वी घेतलेल्या सभेत त्यांनी ‘दिव्याखाली अंधार’असे वक्तव्य केले होते. तोच इम्पॅक्ट मनसेला तारणारा ठरला आहे. म्हात्रे यांना डोंबिवलीतील सागाव, सागर्ली या परिसरात चांगले मतदान मिळाले आहे.
कल्याण : कल्याण ग्रामीणमधील लढत अटीतटीची ठरली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून क्षणाक्षणाला बदलणाऱ्या चित्राने उत्कंठा आणि धाकधूक वाढत होती. शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे आणि मनसेचे उमेदवार प्रमोद ऊ र्फ राजू पाटील यांच्यापैकी कोण बाजी मारणार, हे निश्चित होत नसल्याने गुरुवारचा हा दिवस दोन्ही उमेदवारांची परीक्षा पाहणारा ठरला. अखेर, या अटीतटीच्या लढतीमध्ये मनसेने बाजी मारत शिवसेनेचा पराभव केला.
सकाळी ८ वाजल्यापासून पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत मनसेचे पाटील आघाडीवर असल्याने मतमोजणीकेंद्राबाहेर झेंडे घेऊ न मनसेचे कार्यकर्ते दाखल झाले. पाचव्या फेरीपर्यंत पाटील यांच्याकडे आघाडी कायम होती. मात्र, इंजिनाच्या वेगाला आठव्या फेरीमध्ये शिवसेनेने ब्रेक लावला आणि आघाडी घेण्यास सुरुवात केली आणि शिवसैनिकांनी ‘आवाज कुणाचा शिवसेनेचा’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मतदान मोजणीकेंद्राबाहेर शिवसैनिकांनी भगवा झेंडा फडकावत घोषणाबाजी सुरू केली. शिवसेना आपला बालेकिल्ला अबाधित ठेवेल, अशी चर्चा मतदानकेंद्राबाहेर सुरू झाली.
बाविसाव्या फेरीनंतर उमेदवारांच्या मतांमधील फरक कमी झाला. त्यामुळे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता, उत्कंठा आणि धाकधूक पाहायला मिळाली. २६ व्या फेरीनंतर चित्र पालटून मनसेच्या पाटील यांनी दोन हजार २८८ मतांची पुन्हा आघाडी घेतली. २७ व्या फेरीनंतर चार हजार २५१ मतांची आघाडी घेतल्यानंतर मनसैनिकांनी विजयोत्सव सुरू केला.