ठाणे – टोल दरवाढीवरून मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह कार्यकर्ते गेल्या ४ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तेव्हा उपोषण आपलं काम नव्हे. लवकरच टोलबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करेन. त्यानंतर टोलचं काय करायचे हे सांगेन असं म्हणत राज ठाकरे यांनी टोलमुक्त महाराष्ट्राची पुन्हा शिवसेना-भाजपाला आठवण करून दिली.
मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, टोलदरात जी वाढ झालीय, त्याविरोधात अविनाश जाधव आणि सहकारी उपोषणाला बसले होते. मी अविनाशला फोन करून हे उपोषण वैगेरे आपलं काम नाही, मी भेटायला येतो. गेल्या अनेक वर्षापासून मनसे टोल नाक्यांबाबत आंदोलन करतंय. मनसे आंदोलनातून ६५ टोलनाके बंद झाले. निवडणुकीत भाजपा-शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू असं आश्वासन दिले होते. परंतु पत्रकारांना वेळ नसल्याने त्यांनी कधीही सरकारला हा प्रश्न विचारला नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं.
तसेच टोल भरूनही रस्त्यावर खड्डे असतील तर टोल का भरायचे?, रोड टॅक्सही भरायचा आणि टोलही भरायचा मग पैसे जातात कुठे? टोलविरोधात एकनाथ शिंदे यांनीही याचिका दाखल केली होती. ही याचिका मागे का घेतली? कुणाच्या सांगण्यावरून याचिका मागे घेतली? एकीकडे लोकांना आश्वासने द्यायची आणि दुसरीकडे टोल घ्यायचे, जनतेचेही आश्चर्य वाटते, जे पिळवणूक करतात त्यांनाच मतदान केले जाते. अशा लोकांसाठी एक माणूस मेल्याने काही फरक पडणार नाही. मला आज अनेक लोकं भेटली, त्यांनी निवेदने दिली. येत्या २-३ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेईन, या सर्व गोष्टी मी सांगेन, त्यानंतर वाढीव टोलचं काय होणार हे सांगू शकेन असंही राज ठाकरेंनी म्हटलं.
दरम्यान, निवडणुका तोंडावर आहेत, मुख्यमंत्रीही ठाण्याचे आहेत. लोकांचा आक्रोश आणि राग हे त्यांनाही परवडणारा नाही. त्यामुळे २-३ दिवसांत माझी मुख्यमंत्र्यासोबत भेट होईल, त्यानंतर काय होतंय हे मी सविस्तर सांगेन
त्याच त्याच लोकांना निवडून दिल्यानंतर अशाप्रकारे गोष्टी होतात. निवडणुकीत मतदान करताना रस्त्यावरील खड्डे, दरवाढ हे लक्षात न घेता इतर बाबींवर मतदान केले जाते, त्यानंतर ५ वर्ष डोक्याला हात लावून बसता. या सर्व गोष्टींचा जनतेनेही विचार केला पाहिजे असं राज ठाकरेंनी सांगितले.
कमिशन मिळवण्यासाठी मोठे रॅकेट
मुंबई-नाशिक रस्त्यावर दरवर्षी खड्डे पडलेले दिसतील. जर चांगले रस्ते केले, पुढील २०-२५ वर्ष कामे निघणार नाहीत. कामे निघाली नाही तर टेंडर निघत नाहीत. टेंडर निघाले नाही तर कमिशन मिळणार नाही. हे सगळे रॅकेट आहे. चांगला फुटपाथ खोदून कामे केली जातात. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाऊन विचारा. चांगला रस्ता पुन्हा का खोदला जातो असा आरोप राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केला.