भिवंडी : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती क्रमांक पाचच्या हद्दीतील श्री वज्रेश्वरी ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निष्कासीत करण्याच्या मागणीसह या अनधिकृत बांधकामास अभय देणाऱ्या सहाय्यक आयुक्त सुनिल भोईर यांची विभागीय चौकशी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष मनोज गुळवी व मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी महानगरपालिका मुख्यालयासमोर बोंबाबोब आंदोलन करण्यात आले.
शहरातील अंबिका नगर येथील श्री वज्रेश्वरी देवी ट्रस्ट च्या नावे असलेल्या भूखंडा वर एका अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरू असून त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतीने पालिका प्रशासनाकडे तक्रार देत कारवाईची मागणी केली .विशेष म्हणजे त्याच दरम्यान प्रभाग समिती क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई न केल्याचा ठपका ठेवत प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुनील भोईर यांना निलंबित केले होते .परंतु दोन महिन्यात कारवाई करण्याची लेखी हमी दिल्या नंतरही अवघ्या १३ दिवसात सुनील भोईर यांच्या वरील निलंबन कारवाई रद्द करत त्यांना सेवेत रुजू करण्यात आले.
मात्र अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली नाही. मनपा प्रशासनाचे हे कार्य निषेधार्थ असल्याचे मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी सांगत या भ्रष्टाचारास तत्कालीन सहाय्यक आयुक्त सुनील भोईर हेच जबाबदार असून त्यांची विभागीय स्तरावर चौकशी करावी,त्यांच्या आर्थिक संपत्ती ची चौकशी करावी, अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करीत बांधकाम तोडण्यात यावे अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे परेश चौधरी यांनी सांगितले, यावेळी मनविसेनेचे विभाग अध्यक्ष कुणाल आहिरे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
आंदोलनादरम्यान मनसेच्या शिष्ठमंडळाने मनपा मुख्यालय उपायुक्त दिपक पुजारी यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मनपा प्रशासन मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेऊ अशी ताठर भूमिका घेतल्या नंतर मनसेच्या मागण्यांना मनपा प्रशासन लेखी उत्तरे देऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करेल असे आश्वासन पुजारी यांनी मनसेच्या शिष्ठ मंडळास दिले.