मीरारोड - महापालिका व शासनाच्या कात्रीत अडकलेले भाईंदरचे पंडित भीमसेन जोशी रुग्णालय म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला असून याला सत्ताधारी भाजपा जबाबदार असल्याचा आरोप करत मनसेने रुग्णालयाच्या आवारात आंदोलन केले. आपल्या आप्तेष्टाचा जीव वाचवायचा असेल तर गंभीर अस्वस्थेतील रुग्णांना येथे आणू नये असे आवाहन करणारा फलक मनसेने लावला.
मीरा भाईंदर महापालिकेने सुरु केलेले जोशी रुग्णालय हे सुरुवातीपासून वादग्रस्त ठरले आहे. दिड महिन्यापूर्वी सदर रुग्णालय शासनाला कागदोपत्री हस्तांतरित झाले असले तरी वैद्यकीय सेवा उलट खालावत चालली आहे. २४ जुलैपासून रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला असून यात १६ ते २३ वयोवर्षांच्या मुलं, तरुणाचा समावेश आहे. आधीच विविध तक्रारी त्यात मुलांचे मृत्यू झाल्याने आज मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे, सुषमा बाठे, अनु पाटील, सोनिया फर्नांडिस, रेश्मा तपासे, शहनाझ, गौरवी जाधव , कविता वायंगणकर, हेमंत सावंत, दिनेश कनावजे, शशी मेंडन, रफिक पठाण, विजय फर्नांडिस, रॉबर्ट डिसोझा, हरीश सुतार, सूर्या पवार, नितीन बोंबले, जितू शेणॉय आदी पदाधिकाऱ्यांसह मनसैनिकांनी रुग्णालयाच्या आवारात निदर्शने केली. पालिका उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे येऊन उत्तर देत नाहीत तोपर्यंत हलणार नाही असे सांगत मनसैनिकांनी रुग्णालयात धरणे धरले. मनसेने रुग्णालयाच्या आतील प्रवेशद्वारावर फलक लावून रुग्णालयात अत्यावश्यक सेवा - सुविधा नसल्याने नागरिकांनी आपल्या आप्तेष्टाना जोशी रुग्णालयात दाखल करू नये असे आवाहन केले. भाईंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रेय बोराटे सह पोलीस पथक तसेच दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी धावून आले. डॉ. पानपट्टे रुग्णालयात आल्या नंतर शिष्टमंडळाशी त्यांनी चर्चा केली .
रुग्णालय म्हणून अत्यावश्यक आयसीयू , एनआयसीयु , व्हेंटिलेटर , तज्ञ डॉक्टर आदी आवश्यक सुविधाच नसल्याने येथे रुग्णाचे मृत्यू होत असून याला पालिका व सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप सुर्वे यांनी केला . वेळीच न होणारे उपचार व तपासणी , डॉक्टर - परिचारिका , लॅब टेक्निशियन आदी जागेवर नसल्याच्या तक्रारी नित्याच्याच झाल्या आहेत . कामावर असताना कर्मचारी मोबाईलवर खेळत बसतात , रुग्ण वा नातलगांशी अरेरावी केली जाते असा पाढाच मनसे पदाधिकाऱ्यांनी वाचला. त्यावर रुग्णालय हे शासनास हस्तांतरित झाले असून पालिका केवळ सहकार्य करत आहे. येत्या काही महिन्यात आयसीयू आदी सर्व सुविधा सुरु होतील. तुमचे निवेदन शासनाला पाठवू तसेच रुग्णालयात सध्या देण्यात येणाऱ्या सुविधा व वैद्यकीय उपचार याचे माहितीचे फलक लावू असे आश्वासन डॉ . पानपट्टे यांनी दिले. दरम्यान डॉ . पानपट्टे यांनी मनसेचे शिष्टमंडळ जाताच रुग्णालयातील डॉक्टर , परिचारिका , सुरक्षा रक्षक, कर्मचारी आदींची तातडीची बैठक घेतली. कामाच्या वेळात जागेवर हजर रहा, मोबाईल वर खेळू नका, रुग्ण - नातलगांशी चांगले वागा अश्या सूचना करतानाच तक्रार आल्यास निलंबनाची कारवाई करू असा इशारा दिला. येणाऱ्या रुग्णाची स्थिती समजून घ्या व आपल्या कडे उपचार होणार नसतील तर तसे त्यांना तातडीने मार्गदर्शन करा. रुग्ण - नातलग यांच्याशी गोडीने व समजूतदारपणे वागा. अरेरावी, उद्धट वागू नका अशी समज त्यांना दिली.