अंबरनाथ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या पुढाकाराने आणि तहसील कार्यालयाच्या सहकार्याने बुधवारी सरकारी दाखले वाटप शिबिर झाले. शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. साडेचारशेच्या वर अर्ज सादर करण्यात आले. त्यापैकी दोनशेच्यावर दाखले वाटप करण्यात आल्याची माहिती आयोजक संदीप लकडे यांनी दिली.
शिबिरात जातीचा दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास दाखला, नॉन क्रिमिनल दाखला आदी मिळण्यासाठी अर्ज घेण्यात आले. या शिबिरात सर्व प्रकारच्या अर्जाची सुविधा, सरकारी अधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शन, प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर, कोर्ट फी स्टॅम्प आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.राज्य सरकारच्या राजस्व अभियानातंर्गत सरकारी दाखले वाटप करण्याची शिबिरे विविध ठिकाणी होतात. नागरिकांना सरकारी वेळेत कार्यालयात येणे शक्य होतेच असे नाही. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी विविध दाखले लागतात. अशा विद्यार्थ्यांना या शिबिरांचा लाभ होत असतो असे तहसीलदार जयराज देशमुख यांनी सांगितले. कोणत्याही राजकीय अथवा सामाजिक शैक्षणकि संघटनांच्या पुढाकाराने असे शिबिर होत असले तरी तहसील कार्यलयाकडून सहकार्य केले जाते. या शिबिरांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन देशमुख यांनी केले.मनसेचे उपाध्यक्ष काका मांडले, सरचिटणीस प्रकाश भोईर, ब्लॉक काँग्रेसचे कार्याध्यक्ष उमेश पाटील, मनसे शहर अध्यक्ष कुणाल भोईर, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष धंनजय गुरव, नगरसेविका सुप्रिया देसाई आदी उपस्थित होते.अखिल वडवली मित्र मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.