"शरद पवारांनी, राष्ट्रवादी काँग्रेसनं सांगावं राज ठाकरे त्यांची भूमिका बदलतात म्हणून? परदेशी व्यक्ती पंतप्रधान चालणार नाही हे बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात प्रथम सांगितलं होतं. मग तोच धागा पकडून शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. १९९९ ला सोनिया गांधी नको म्हणून बाहेर पडले. निवडणुकांचा निकाल लागला, पुन्हा काँग्रेससोबत गेले आणि दोन महिन्यांत भूमिका बदलली," असं राज ठाकरे म्हणाले. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या उत्तर सभेत राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
"शरद पवारांनी बदललेल्या असंख्य भूमिका सांगता येतील. मी कोणती भूमिका बदलली?," असा सवालही राज ठाकरेंनी केला. "मी भूमिका बदलली नाही. पाकिस्तान कलाकारांना हकलणारा माझा महाराष्ट्र सैनिक होता. पाकिस्तानी कलाकारांना घ्याल तर याद राखा त्यांना नोटीस कोणाकडून गेली. आझाद मैदानावर जेव्हा रझा अकॅडमी मोर्चा काढला, पोलीस भगिनींना मारलं. त्यांना काय त्रास दिले, पत्रकारांच्या गाड्या फोडल्या, कोणी प्रतिक्रिया नाही दिली. त्यांच्या विरोधात केवळ मनसेनं मोर्चा काढला. तेव्हाचे कमिश्नर अरुण पटनाईक हेच पोलिसांवर ढाफरले. तो मोर्चा त्यांना पदावरून हटवण्यासाठी काढला होता. तो मोर्चा इतका ताकदवर होता की सरकारला निर्णय घ्यावा लागला आणि त्यांना पदावरून काढलं," असंही ते म्हणाले.
"सुप्रिया सुळेंच्या घरी धाड नाही""एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी ईडीची रेड पडते आणि सुप्रिया सुळेंच्या घरी पडत नाहीत, याचे कारण काय. शरद पवार एकावर छापा पडला की दुसऱ्या माणसाचे नाव सांगायला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतात. पुढचा माणूस कोण हे ते त्यांना सांगत असतील. देशमुख आत गेले पवारांनी भेट घेतली, अजित पवारांच्या नातलगांवर रेड पडली पवारांनी मोदींची भेट घेतली, राऊतांवर कारवाई झाली, पवारांनी भेट घेतली. पुतण्यावर ईडी कारवाई करते आणि मोदींशी पवारांचे चांगले संबंध कसे काय," असे सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केले.