लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : येत्या १५ दिवसांत अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाल्यांपासून मुक्त करावा; अन्यथा १६ वा दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल. कायदा हाती घेऊन फेरीवाल्यांपासून स्टेशन परिसर मुक्त करून दाखवेल, असा इशारा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिला. संधी द्या, एका तासात फेरीवाले हटवून दाखवतो, अशा शब्दात प्रशासनाला यावेळी ठणकावले.
शहरातील रखडलेली विकासकामे, सार्वजनिक स्वच्छता, अनधिकृत बांधकामे, पार्किंगची समस्या, प्रशासनाचा नागरिकांशी तुटलेला संवाद, यांसारख्या नागरिकांना जाणवणाऱ्या समस्यांच्या संदर्भात गुरुवारी जिल्हाध्यक्ष जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका कार्यालयावर मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांची भेट घेऊन शहरातील विविध नागरी समस्यांबाबत चर्चा केली.
जिल्हाध्यक्ष जाधव यांच्या नेतृत्वाखाली वडवली विभागातून मोर्चा निघाला. जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के, शहराध्यक्ष कुणाल भोईर, संघटक संदीप लकडे, स्वप्निल बागुल, अविनाश सुरसे, धनंजय गुरव, माजी नगरसेविका अपर्णा भोईर, सुप्रिया देसाई उपस्थित होते.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरावर फेरीवाले बसू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत चार दिवसांची मुदत मनसेच्या वतीने मागण्यात आली. मात्र, नियोजन करण्यास वेळ द्यावा, असे पोलिस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आल्यानंतर १५ दिवसांची मुदत देण्यात आली. कारवाई करताना मनसे पदाधिकाऱ्यांना अटक केली तरी अंबरनाथबाहेरील पदाधिकारी मागवून आंदोलन केले जाईल, असेही जिल्हाध्यक्ष जाधव यांनी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांना सांगितले.