उल्हासनगर : मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अजीज शेख यांची गुरवारी भेट घेऊन, शहरातील रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई, कचऱ्याचे ढीग, डम्पिंग ग्राऊंड, अवैध बांधकामे यासह धोकादायक इमारत पुनर्बांधणी बाबत शासनाचे परिपत्रक आदी समस्यांचा पाडा आयुक्ता समोर वाचला. आयुक्तांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन विकास कामाला गती देण्याचे आश्वासन दिले.
उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजीज शेख यांची मनसे शिष्टमंडळाने गुरवारी भेट घेऊन, शहरातील विविध समस्यांवर चर्चा केली. रस्त्याची दुरावस्था, रस्त्यातील जीवघेणे खड्डे, जुन्या आणि जीर्ण झालेल्या गळक्या जलवाहिन्या, रखडलेली विकास कामे, पाणी टंचाई आदी समस्या सोडविण्याची मागणी मनसे शिष्टमंडळाने आयुक्तांना केली. पावसाने उसंत घेतली असूनही रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम महापालिका बांधकाम विभागाने सुरू केले नाही. याबाबत नाराजी व्यक्त केली. पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी महापालिकेने ८ कोटींची तरतूद केली. मात्र पावसाळ्या पूर्वी रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम राहून गेले. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था झाली.
पावसाळ्यात रस्त्यातील खड्ड्यात माती, रेती, दगड टाकून तात्पुरते खड्डे बुजविण्याचे काम केले. तसेच पावसाळ्याने उसंत घेताच रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे युद्धपातळीवर भरण्याचे संकेत आयुक्त अजीज शेख यांनी दिले होते. मात्र पाऊस थांबून एक आठवडा उलटला. तरीही रस्त्याचे काम अद्याप सुरू न झाल्याने, नागरिकांत असंतोष निर्माण झाला. महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या सोबत झालेल्या मनसे शिष्टमंडळात पक्षाचे सचिन कदम, प्रदीप गोडसे, शहर संघटक मैनुद्दीन शेख पक्ष पदाधिकारी शैलेश पांडव, सुभाष हटकर, वैभव कुलकर्णी, काळू थोरात, कैलाश वाघ, आशिष सोनी, मधुकर बागुल, अध्यक्ष संजय नार्वेकर, अजय बागुल, पंकज राजगुरू आणि मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.