मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्या दिवशी शिवतीर्थावर केलेल्या भाषणानंतर सत्ताधाऱ्यासह अनेकांनी टीकेचे आसूड ओढले होते. या सर्वाचा समाचार घेण्यासाठी तसेच उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांची 'उत्तरसभा' आज ठाण्याच्या गडकरी रंगायतनसमोरील डॉ.मूस रोडवर होत आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून फलक, बॅनर यासह मनसेकडून सोशल मीडियात जारी करण्यात आलेल्या टीझरचा चांगलाच बोलबाला सुरू आहे. याच दरम्यान राज ठाकरेंच्या आजच्या सभेआधी मनसेने एक सूचक ट्विट केलं आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "राजसाहेबांच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर ज्यांना "लाव रे तो व्हिडीओ"ची खूप आठवण येत होती त्यांच्यासाठी खास आजची #उत्तरसभा" असं देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात खळबळ उडवून देणाऱ्या 'लाव रे तो व्हिडीओ' या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाक्याची प्रचिती आज होणाऱ्या ठाण्यातील 'उत्तर सभेत पुन्हा एकदा घेता येणार आहे. सोशल मीडियात हिंदुत्वाचा ज्वलंत पुरस्कार करीत धुमाकुळ घालणाऱ्या टीझरमुळे राज ठाकरे यांची जाहीर सभा अविस्मरणीय ठरण्याची चिन्हे आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात धुमाकूळ घालणाऱ्या 'लाव रे तो व्हिडीओ' या सारख्या अनोख्या तंत्राचा अवलंब ठाण्यातील उत्तर सभेपासुन पुन्हा सुरू होणार असल्याची खात्रीलायक माहिती मनसे सुत्रांनी दिली. तर, राज ठाकरे यांच्या या व्हिडीओ अस्त्राच्या पवित्र्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या गोटात मात्र दहशतीचे वातावरण पसरले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्याच्या इतिहासातील सगळ्यात भव्य सभा होणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधकांचा समाचार यामध्ये घेण्यात येणार आहे. ठाणे मनसेकडून जोरदार तयारी सभेची आयोजन करण्यात आली असून आता राज ठाकरे यांच्या आगमनाची आतुरता लागली आहे.
प्रदीर्घ कालावधीनंतर ठाण्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. उत्तरसभेत ते काय बोलणार याची उत्सुकता शिगेला गेली आहे. परंतु, त्यासाठी शहर मनसेने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी हातात भगवे झेंडे घेऊन तब्बल 200 चारचाकी आणि एक हजार दुचाकीस्वारांच्या रॅली ठाण्याच्या वेशीवरून थेट सभास्थळापर्यंत आणण्यात येणार आहे. एक प्रकारे आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग या सभेच्या निमित्ताने फुंकले जाणार असल्याचे दिसत आहे.