ठाणे : मशिदीवरील भोंगे ३ मेपर्यंत न उतरविल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला होता. त्याअनुषंगाने मुंब्रा कौसा येथील जामा मशिदीवरील भोंगे काढले न गेल्यास त्यासमोर ४ मे रोजी हनुमान चालिसा पठण करण्याची आणि त्यासाठी भाेंगा लावण्याची परवानगी देण्याची मागणी मनसेचेठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुंब्रा पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी मशीद म्हणून कौसा येथील जामा मशिदीची ओळख आहे. या मशिदीवरील भोंगे उतरवले न गेल्यास ४ मे रोजी सकाळपासून विविध वेळेत हनुमान चालिसा पठण करण्याची आणि त्यासाठी भोंगे लावण्याची परवानगी द्यावी, असेही जाधव यांनी मुंब्रा पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.