उल्हासनगर : शहर मनसेनेखड्डे विथ सेल्फी स्पर्धा ठेवली असून पहिल्या उत्कृष्ट ३ खड्ड्याच्या फोटोना बक्षीस जाहीर केले. संततधार पावसाने शहरातील बहुतांश रस्त्याची दुरावस्था जाऊन रस्त्यात जीवघेणे खड्डे निर्माण झाले.
उल्हासनगरातील शांतीनगर ते डॉल्फिन रस्ता, मोर्यांनगरी रस्ता, पवई चौक ते विठ्ठलवाडी स्टेशन रस्ता, खेमानी परिसर रस्ते, गायकवाड पाडा रस्ता शहर अंतर्गतीतील रस्त्याची दुरावस्था झाली. प्रभाग क्रं-६ येथील माजी नगरसेवक माखिजा यांच्या कार्यालया परिसरात रस्त्यातील खड्ड्यात अनेक जण दुचाकीसह पडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहेत. फॉरवर्ड लाईन चौक, संभाजी चौक, शांतीनगर, मध्यवर्ती पोलीस स्टेशन समोर रस्त्यात जीवघेणे खड्डे झाले.
पावसाळ्यापूर्वी महापालिकेने रस्त्यातील खड्डे न भरल्याने, रस्त्यात खड्डेच खड्डे झाले. रस्त्यातील जीवघेण्या खड्ड्याकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे मनोज शेलार यांनी खड्डे विथ सेल्फी ही स्पर्धा आयोजित केली. उत्कृष्ट पहिल्या खड्ड्यासाठी २ हजार २२२ रुपये, दुसऱ्या खड्ड्यासाठी १ हजार १११ तर तिसऱ्या उत्कृष्ट खड्ड्यासाठी ५५५ रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
मनसेच्या खड्डे विथ सेल्फी स्पर्धेनंतर महापालिका रस्त्यातील खड्डे भरते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पावसाळ्यात रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी ५ कोटीच्या निधीची तरतूद केली. मात्र संततधार पाऊस असल्याने, खड्डे माती, रेती, दगड याने तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येत आहे. पाऊस थांबताच खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली आहे.