भिवंडी : भिवंडी-ठाणे या रस्त्याची खड्ड्यांमुळे पूर्णतः दुरवस्था झाली आहे. कशेळी येथील टोल नाक्यावर टोलवसुली मात्र सुरू आहे. या रस्त्यावर तत्काळ खड्डे दुरुस्ती करा, अन्यथा टोलवसुली बंद करा, या मागणी करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कशेळी टोल नाका येथे बुधवारी मुंडण करून श्राद्ध आंदोलन केले. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष डी.के. म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी, मदन पाटील, मनोज गुळवी, संतोष साळवी, शिवनाथ भगत, परेश चौधरी, शरद नागावकर, संजय पाटील, अशरफ खान मोतीवाले, भरत पाटील, कामिनी खंडागळे यांसह असंख्य मनसे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ठाणे-भिवंडी हा रस्ता बीओटी तत्त्वावर तयार केला असून, रस्त्यावर ठाणे-भिवंडी कल्याण मेट्रो रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने नागरिक, तसेच वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. अंजूरफाटा ते कशेळी या दरम्यान खड्डे असल्याने अवघ्या सात किलोमीटरचे अंतर पार पाडण्यासाठी तब्बल दोन ते अडीच तासांचा वेळ लागताे. अनेक वाहन चालकांना मानेचा, कमरेचा, पाठीच्या आजारांना सामारे जावे लागत आहे. अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे खराब रस्त्यांविराेधात मनसेने टोल कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभाग कारणीभूत असून, त्या विरोधात टोल नाका येथे मनसे कार्यकर्त्यांनी मंत्रघोषात श्राद्ध घालून दोन कार्यकर्त्यानी मुंडण केले. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह चोख बंदोबस्त टोल नाक्यावर ठेवला होता.