ठाणे : कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून थकबाकीदाराच्या पत्नीला उचलून नेण्याची धमकी देणाऱ्या मेन्टिफी फायनान्स कंपनीच्या मुजोर प्रतिनिधीला मनसेने चोप दिला. तसेच त्या महिलेची पाया पडून माफी मागायला सांगितली.
कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून पत्नीला उचलून नेतो, अशी धमकी मेन्टिफी फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी राज शुक्ला याने थकबाकीदार प्रशांत पांचाळ यांना फोनद्वारे दिली होती. याबाबतची तक्रार पांचाळ यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे केली. त्यानंतर पाचंगे यांनी पांचाळ यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन घडलेला प्रकार सांगितला व याबाबत तक्रार नोंदविण्यात आली. या प्रकरणाबाबत ठाण्यातील विविध महिला संघटनांनी निषेध व्यक्त करून राज शुक्ला याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. अखेर गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हाध्यक्ष, विभाग अध्यक्ष पाचंगे यांनी शुक्ला याला मनसे स्टाईलने चोप दिला.
कोरोनाकाळात गोरगरिबांना थकीत देणींसाठी धमक्या देणाऱ्या सर्व कंपन्यांनी पुन्हा अशी चूक केल्यास असाच मनसे स्टाईल दणका दिला जाईल, असा सज्जड दम त्यांनी भरला आहे. पीडित पांचाळ कुटुंबीयांची मेन्टिफी फायनान्समध्ये काम करणारा वसुली अधिकारी शुक्लाला पाया पडून माफी मागण्यासदेखील त्यांनी भाग पाडले. या वेळी मनविसे उपशहराध्यक्ष संदीप चव्हाण, विभाग सचिव मयूर तळेकर, विभाग अध्यक्ष विवेक भंडारे, उपविभागाध्यक्ष सागर वर्तक, मंदार पाष्टे, शाखाध्यक्ष हृषीकेश घुले, कुश मांजरेकर, हृषीकेश सावंत, रोहित परब आदी उपस्थित होते.