कल्याण : कल्याणच्या स्कायवॉकवर नागरिकांना लुटणाऱ्या तृतीयपंथींना मनसेने गुरुवारी रात्री चोप दिला. तसेच मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या एका आरपीएफ जवानाची शाळा घेतली.
स्कायवॉकवरून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांकडून तृतीयपंथी पैसे मागतात, अशी तक्रार मनसेच्या पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. त्या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी उल्हास भोईर, रोहन अक्केवार, शीतल विखणकर, कपिल पाटील हे कार्यकर्ते रात्री पोहोचले. त्यांनी नागरिकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथींना चांगला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. या वेळी स्कायवॉकवर एकच गर्दी जमली होती. मनसे कार्यकर्ते स्कायवॉकवर पोहोचले होते. तेव्हा त्यांना आरपीएफ जवानांनी मज्जाव केला होता. मज्जाव करणारा आरपीएफ जवान हिंदीत बोलत असल्याने त्याला मराठी बोलण्याचा आग्रह मनसेच्या पदाधिकाऱ्याने केला. त्यावर आरपीएफ जवान जितेंद्र सिंग याने तुम्ही हिंदीत बोला, मला मराठी येत नाही, असे सांगितल्यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी सिंग याची मराठीत शाळा घेतली. महाराष्ट्रात कर्तव्य बजावीत असताना मराठी येत नाही, हिंदीत बोला असे उलट आम्हालाच सांगता. हे खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम भरला.
-----------------