लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका आर्थिक संकटात असतानाही नगरसेवक आणि अधिकारी ४० लाख रुपये खर्चून कोलकाता आणि गंगटोक येथे अभ्यास दौ-यावर जाणार आहेत. नागरिकांच्या करातून ही उधळपट्टी कशाला, असा सवाल करत मनसेच्या विद्यार्थी सेनेने त्याला विरोध केला आहे. नगरसेवकांच्या दौºयासाठी भीक मागून निधी गोळा करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे डोंबिवली शहराध्यक्ष सागर जेधे यांनी दिला आहे.महापालिकेचा यंदाचा वर्षाचा अर्थसंकल्प हा एक हजार १४० कोटी रुपये होता. महापालिकेस विविध करांतून मार्च २०१८ अखेरपर्यंत ८४० कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. हे उत्पन्न मिळूनही महापालिकेस ३०० कोटी रुपयांची तूट सहन करावी लागणार आहे.ही तूट भरून काढण्यासाठी नगरसेवकांनी सुचवलेले उपाय महापालिका प्रशासनाकडून अद्याप अवलंबलेले नाहीत. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत कोणतेही विकासकाम होणार नाही. केवळ बांधील खर्च केले जातील, असे आयुक्तांनी सांगितले आहे. या तुटीचा फटका विकासकामांबरोबर नगरसेवक निधीलाही बसला आहे. महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’च्या आधारे खरेदी केलेल्या गणवेश आणि शालेय साहित्याच्या बिलाची रक्कम अजूनही त्याच्या खात्यात जमा झालेली नाही.विविध शाळांच्या परिसरातील रस्ते हे खड्डेमय आहेत. असे असतानाही महापालिकेने नगरसेवक आणि अधिकाºयांचा पाहणीचा दौरा आखला आहे. हा दौरा महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. एखादा नगरसेवक दौºयाला न आल्यास त्याचा खर्च त्याच्या मानधनातून वळता केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.महापालिकेतर्फे नगरसेवकांचे यापूर्वीही पाहणी व अभ्यास दौरे झाले आहेत. त्यावरही लाखो रुपये खर्च झाले आहेत. त्यातून काहीच साध्य झालेले नसताना आणखी ४० लाखांचा खर्च नागरिकांच्या पैशांतून कशासाठी, असा सवाल जेधे यांनी केला आहे.महापौरांनी याप्रकरणी पुढाकार घेऊन हा दौरा रद्द करणे आवश्यक आहे. महापालिकेने दौरा रद्द न केल्यास मनसे विद्यार्थी सेनेचा ठाम विरोध राहील. मनसे नगरसेवक दौºयासाठी भीक मांगो आंदोलन करून निधी जमा करेल, असा इशारा जेधे यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे.
नगरसेवक दौ-यास मनसे विद्यार्थी सेनेचा विरोध, केडीएमसीला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 6:10 AM