ठाणे : शहरातील दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याचे पत्र देऊन ठाण्यातील मनसे पदाधिकाºयांनी १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्याच्याकडून हिंसक आंदोलन होईल, या भीतीने ठाणे पोलिसांनी त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यानंतरही खळ्ळखट्याक करू,असा इशारा ठाणे शहर मनसेने दिला आहे.१५ दिवसांपूर्वी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर, ठाण्यात मनसे पदाधिकाºयांनी शहरातील ५०० दुकानदारांना पत्र देऊन मराठी पाट्या लावण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली. एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर मनसेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक आंदोलन केले. ठाणे, कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांना त्यांनी मारहाण केल्याने पोलिसांनी त्यांना अटकदेखील केली होती. आता पुन्हा त्यांच्याकडून आंदोलनाची भीती व्यक्त केली जात आहे. यासाठी पोलिसांनी ठाण्यातील मनसेच्या २५ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी आंदोलने करू नयेत, असे त्यात बजावले असून त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. परंतु, नेहमीप्रमाणे मनसे पोलिसांच्या नोटिसांना जुमानणार नसून १५ दिवसांत दुकानाबाहेर मराठी पाट्या न दिसल्यास खळ्ळखट्याकची भाषाच वापरण्यात येईल. त्याआधी कामगार आयुक्तांना घेराव घातला जाईल, असा इशारा ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला. कामगार आयुक्तांना याबाबत सर्वांसाठी एकच नोटीस काढा, असेदेखील सांंगण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मनसेने २००८ साली ठाणे शहरात मराठी पाट्यांसाठी आंदोलन छेडले होते. त्यानंतर, पुन्हा आंदोलन होणार आहे.
मराठी पाट्यांसाठी मनसे खळ्ळखट्याकवर ठाम, आंदोलन करण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 2:26 AM