ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी येथे जाहीर केले. ठाण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात आगामी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्याबाबत ठाकरे यांनी ठाणे-पालघर जिल्ह्यांतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडताना राज म्हणाले की, रविवारी वर्ल्ड कप फायनल आहे. दुसरी सेमिफायनल गुरुवारी आहे. आज सेमिफायनल खेळणाऱ्या दोन्ही टीमना तुमच्यापैकी जो जिंकेल आणि फायनलला जाईल त्यांना ‘साहब ने बोला है, हारने को,’ असे सांगितले जाऊ शकते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील भाजप वेगळी होती. आताची भाजप वेगळी आहे. छापे घालून दबाव टाकण्याचे राजकारण जास्त काळ टिकणार नाही, असेही ते म्हणाले.
पदवीधर मतदार संघातून प्रमोद नवलकर जेव्हा उभे होते, तेव्हा त्यांनी उमेदवारी अर्ज दाखवला होता. त्याखाली सही किंवा अंगठा असे लिहिलेले होते. पदवीधरांनी ज्या उमेदवाराला मतदान करायचे तो शिकलेला असला पाहिजे, अशी अट नाही. पदवीधरांच्या मतांवर आमदार होणारा पदवीधर नसला तरी चालेल, अशी ही निवडणूक आहे, अशा शब्दांत राज यांनी नाराजी व्यक्त केली.
मराठी पाट्यांसाठी हात-पाय हलवावे लागतील
फटाके कधी लावायचे, सण कसे साजरे करायचे हे कोर्ट ठरवणार. कोर्टाचे आदेश पाळले जात नाहीत, त्याकडे मात्र कोर्ट लक्ष देणार नाही. मराठी पाट्यांसाठी आंदोलने झाली, मराठी पाट्यांच्या विरोधात व्यापारी कोर्टात गेले. महाराष्ट्र ज्यांना पोसतोय ते व्यापारी कोर्टात जातात; परंतु, सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानायला हवेत, प्रादेशिक भाषांमध्ये दुकानांच्या पाट्या असाव्यात, असे आदेश न्यायालयाने दिले. परंतु, सरकारकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. कदाचित आम्हालाच पुन्हा हात-पाय हलवावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.
राष्ट्रवादीवर टीका
महाराष्ट्रात १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या जातींबद्दल द्वेषाचे राजकारण सुरू झाले, या आरोपाचा राज यांनी पुनरुच्चार केला. मनोज जरांगे-पाटील यांच्यामागून कोण बोलत आहे, हे काही काळानंतर उघड होईल, असेही ते म्हणाले.