कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेस राज्य सरकारकडून पुरेशी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होत नसल्याने महापालिकेस लसीकरण अनेकदा स्थगित ठेवावे लागते. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय पाहता, मनसेने शनिवारपासून तीन दिवस मोफत लसीकरण सुरू केले आहे. हे लसीकरण म्हणजे एकप्रकारचे आंदोलनच असल्याची मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे.
कल्याण-शीळ रोडवरील प्रिमिअर ग्राऊंडवर भरवलेल्या या मोफत लसीकरण मोहिमेचा प्रारंभ रिक्षा संघटनेचे अध्यक्ष काळू कोमास्कर यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी पाटील यांनी वरील वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘केडीएमसी प्रशासनाकडे लसीकरण केंद्राची मागणी केली होती. सगळा सेटअप तयार करून देण्याची तयारीही दर्शविली होती. मात्र, महापालिकेने केंद्र सुरू केलेले नाही. तसेच कल्याण ग्रामीण भागातील नागरिकांना लसही मिळत नाही. त्यामुळे मनसेने पुढाकार घेऊन लसीकरण केंद्र सुरू केले आहे. यापूर्वी कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महिनाभर स्वखर्चातून वाॅर्डन नियुक्त केले होते. त्याचप्रमाणे आता सरकारीकडून लस मिळत नसल्याने मनसेने स्वखर्चातून लसीकरण सुरू केले आहे.’
केडीएमसीला कोरोना इनोव्हेशन अवॉर्ड मिळाला. महापालिका पुरस्काराची धनी झाली असली, तर लस मिळत नसल्याने नागरिकांच्या मनात महापालिकेविषयी तिरस्काराची भावना असल्याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
दोन हजारजणांना मिळणार लाभ
प्रिमिअर ग्राऊंडवरील लसीकरण येत्या सोमवारपर्यंत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात रिक्षाचालक, सलून दुकानचालक आणि अन्य लोकांना लस दिली जाणार आहे. एकूण दोन हजारजणांचा लस दिली जाणार असून, त्याची चोख व्यवस्था ठेवली आहे.
----------------