ठाणे: मनसेचा पाडवा मेळावा मोठ्या प्रमाणावर गाजला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून राजकीय स्तरातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. मशिदींवरील भोंग्यावरून मनसेचे दोन गट पडल्याचेही दिसले. यानंतर लगेचच ठाण्यात राज ठाकरे यांची उत्तरसभा आयोजित करण्यात आली. या सभेची सुरुवात मनसेचे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या भाषणाने झाली. यावेळी वसंत मोरे यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर वसंत मोरे यांनी सर्वप्रथम नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांची पुण्यातील मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. या मतभेदाच्या वातावरणात वसंत मोरे यांनी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेतली. वसंत मोरे यांनी ठाण्यातील उत्तरसभेला उपस्थिती लावत राज ठाकरे याच्याशीच एकनिष्ठ असल्याचे दाखवून दिले. वसंत मोरे यांनी आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला.
कोरोना परिस्थिती सरकारने योग्य पद्धतीने हाताळली नाही
कोरोना काळानंतर आपण सगळे जण एकत्र जमलेले आहोत. मात्र, कोरोनाची परिस्थिती महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने योग्य पद्धतीने हाताळली नाही. जी कामे सरकार म्हणून करायची होती, ती मनसेने करून दाखवली. पुण्यात अनेक लोकोपयोगी कामे केली. कोरोना काळात दररोज पाच हजार लोकांची जेवणाची व्यवस्था केली. अडचणीच्या काळात पुणेकरांच्या पाठिशी मनसे ठामपणे उभी राहिली, असे वसंत मोरे यांनी सांगितले. तसेच राज ठाकरे यांच्या ब्ल्यू प्रिंटची झलक पाहायची असेल तर कात्रजला या, असेही वसंत मोरे यांनी सांगितले.
निवडणुकीवेळी मनसे आठवत नसल्याची खंत
अडचणीच्या प्रत्येक वेळी मनसे आणि मनसेचा कार्यकर्ता लोकांना आठवतो. मनसे शक्य असेल, तेथे जाऊन सर्वांची मदतही करते. मात्र, अडचणीच्या काळात आठवणारी मनसे, निवडणुकीच्यावेळी आठवत नाही, अशी खंत वसंत मोरे यांनी व्यक्त केली. पुण्यात मनसेचे दोनच नगरसेवक आहेत. मात्र, तरीही चर्चेतील नगरसेवक म्हणून मला पुरस्कार मिळाला. यावरून आम्ही लोकांमध्ये जाऊन किती कामे केली, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. मात्र, तुमच्या भाजपचेच उमेदवार पाडून मी नगरसेवक झालोय, असे प्रत्युत्तर त्यांना दिले, अशी आठवण वसंत मोरे यांनी यावेळी सांगितली.