डोंबिवली - ''महापौर व आयुक्त तसेच सर्व संबंधित पालिका अधिकारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका येत्या २४ तासात जर सावळाराम महाराज क्रीडा संकुल साफ करून दिले नाही तर त्यातील पसरलेला कचरा/कुसलेले अन्न पदार्थ मा.आयुक्त व मा.महापौरांना "सप्रेम भेट" म्हणून पाठविले जातील'', अशा आशयाचे खरमरीत पत्र मनसे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केडीएमसी आयुक्त, महापौर आणि सफाई कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिले आहे.
ते पुढे म्हणतात की, रोज रडे त्याला कोण रडे ह्या उक्ती प्रमाणे कडोंमपाकडे कितीही तक्रारी करा,आंदोलने करा तरीसुद्धा पुन्हा तिच परिस्थिती येरे माझ्या मागल्या. डोंबिवली क्रिडा संकुल मैदान हे एकमेव मैदान खेळाडूंना खेळण्यासाठी, जेष्ठ नागरिक व सकाळ संध्याकाळच्या वॉकसाठी उपयोगी मैदान आहे, हजारो नागरिक त्याचा वापर करत असतात, त्यातच उत्सव प्रिय डोंबिवलीतील सध्या सर्व महत्त्वाची मोठी मैदाने चालण्या, खेळण्यास बंद आहेत, त्यामुळे डोंबिवली क्रीडा संकुलात मोठी गर्दी असते, परंतु दोन दिवसांपूर्वीच पार पडलेल्या कार्यकर्माचा कचरा-अन्नपदार्थ सर्व मैदानभर पसरले आहे त्यामुळे त्याची दुर्गंधी पसरली आहे व्यायामाला, फिरायला व खेळायला येणाऱ्या नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
दर वेळेला महापालिकेला अधिकाऱ्यांना मैदानावरील कार्यक्रमानंतरच्या त्रासाबाबत लक्ष घालून कायम स्वरूपी तोडगा काढण्याबाबत सुचित करून सुद्धा तो त्रास कायमच होऊ लागला आहे, त्यामुळे आता एकच जमाल गोटा देण्याची वेळ निष्काळजी महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींना देण्यासाठी त्यांचे प्रमुख आयुक्त व महापौर यांना क्रिडा संकुलातील पसरलेल्या कचरा व नासके अन्न पदार्थ येत्या २४ तासात सफाई केले नाही तर तो कचरा व नासके कुजके अन्न पदार्थ "सप्रेम भेट" म्हणून पाठविले जातील ह्याची नोंद घ्यावी असे त्यांनी पत्रात म्हटले. सोशल मीडियावर ते पत्र कदम यांनी पाठवले असून त्याची काही ग्रुपवर चर्चा सुरू आहे. कार्यक्रमांसाठी उपलब्ध करताना इतर खासगी मैदाने पैसे घेऊन कशी स्वच्छ, सुंदर ठेवली जातात त्याचा नगरसेवक व पालिका अधिकारी ह्यांनी अभ्यास वर्ग त्या त्या खासगी मैदाने संस्था चालकांकडून करून घ्यावा हिी विनंती, करदात्या मागरीकांचे तेवढे भले होईल, असेही कदम म्हणाले.