मीरारोड : मीरा भाईंदर महापालिकेत भाजपा सत्तेवर आल्यापासून राजभाषा मराठीची गळचेपी होत असून प्रशासन देखील मराठीला दैनंदिन व्यवहार व जाहीर कार्यक्रमात डावलत असल्याचा आरोप करत मराठीचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी मनसेने केली आहे . पालिका आयुक्तांना निवेदन देतानाच यापुढे पालिकेकडून राजभाषेचा अवमान झाल्यास तो राजद्रोह समजून तुमचे कार्यक्रम उधळून लावू असा इशारा देखील मनसेने दिला आहे .
महापालिकेत महापौर यांच्या सह अनेक नगरसेवकांना मराठी येत नसल्याचा मुद्दा मराठी एकीकरण समितीने उपस्थित करत आंदोलन केले होते . पालिकेचा कारभार मराठीतून चालत नसल्या बद्दल तक्रारी करत समितीने थेट भाजपा प्रदेश नेत्यांना देखील निवेदन देत मराठी महापौर द्या अशी मागणी चालवली होती .
वास्तविक मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून शासनाने देखील मराठीचा वापर कामकाजात करण्या बद्दल वेळोवेळी आदेश दिलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये देखील मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक आहे. तसे असताना महासभेत तसेच अन्य समित्यांच्या बैठकीत सर्रास महापौरांपासून अनेक नगरसेवक मराठी ऐवजी अन्य भाषेचा वापर करतात . काही नगरसेवक तर मराठी येत असताना देखील अन्य भाषेत बोलतात .
पालिका प्रशासन देखील आपल्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेला डावलत आहे. आरोग्यविभागाकडून छापण्यात आलेली पत्रके असो किंवा पालिका क्रीडा संकुलात लावण्यात आलेले फलक व जाहिरात पत्रके असो. ती देखील मराठी ऐवजी इंग्रजी, हिंदी भाषेत आहेत. नागरिकांना माहिती देण्यासाठी पालिकेच्या कर विभाग, पाणी पुरवठा विभाग आदींची वाहने शहरात आवाहन करताना व माहिती देताना फिरतात. पण पालिकेचे जाहीर आवाहन देखील गुजराती, हिंदी भाषेत केले जाते .
नुकत्याच झालेल्या महिला बालकल्याण समितीच्या जागतिक महिला दिन कार्यक्रमात देखील चक्क हिंदी भाषेत स्वागताचे प्रवेशद्वार लावले होते. व्यासपीठावर देखील महिला दिन हे इंग्रजी भाषेत लिहले होते. कार्यक्रमात तर पूर्णपणे मराठीचा वापरच केला जात नाही. आमदार, नगरसेवक देखील हिंदीचा सर्रास वापर करतात .
राजभाषा मराठीची सातत्याने गळचेपी महापालिकेत केली जात असून या मागे केवळ मराठी बद्दलचा द्वेष व राजकीय स्वार्थ असल्याचा आरोप मनसे शहर अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी केलाय . राजभाषा मराठीचा अवमान म्हणजे राजद्रोह असून मराठीचा अवमान करणारे तसेच शासन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पालिका अधिकारी - कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी करण्यात आली .
मनसे शिष्ट मंडळाने आयुक्त बी. जी पवार यांना भेटून निवेदन दिले. आयुक्तांनी चौकशी करून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे . या वेळी नरेंद्र पाटोळे , हेमंत सावंत , शशी मेंडन , सचिन पोफळे , प्रमोद देठे , रॉबर्ट डिसोझा आदी उपस्थित होते . राजभाषा मराठीचा पालिकेच्या सर्व कामकाज, कार्यक्रम आदीं मध्ये शंभर टक्के वापर झाला पाहिजे . पण पालिके कडूनच राजभाषेचा अवमान होण्याचे प्रकार गंभीर आहेत. या पुढे पालिकेकडून मराठीचा अवमानका वा मुद्दाम गळचेपी केल्यास पालिकेचे कार्यक्रम उधळून लावू असा असा इशारा देखील मनसेने दिला आहे.